कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात श्रीमंत शाहू महाराज यांच्या उमेदवारीवरून आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये राजकीय वाद वाढत आहे. यातूनच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी सतेज पाटील यांच्यात इतका बालिशपणा येतो कोठून, असा परखड प्रश्न उपस्थित केला. कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यावर हसन मुश्रीफ यांनी शाहू महाराज सर्वांचे आदर्श आहेत. त्यांनी राजकारणात यावे किंवा न यावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, अशी टिपणी केली होती. त्यावर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी शाहू महाराज यांच्याबद्दल आदर असेल तर त्यांना महायुतीने बिनविरोध विजयी करावे, असे आवाहन केले होते. सतेज पाटील यांच्या या विधानाकडे आज लक्ष वेधले असता पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, असे आवाहन करण्या इतका बालिशपणा सतेज पाटील यांच्याकडे कोठून आला. राजकारणात असे होत नाही, असे म्हणत बिनविरोधची शक्यता फेटाळून लावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : वारणा धरणातून थेट पाइपलाइन हाच इचलकरंजीच्या पाण्यासाठी योग्य पर्याय – शाहीर विजय जगताप

घाटगेंबाबत थंडा प्रतिसाद

दरम्यान, कोल्हापूरच्या जागेवर शिंदेसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्या ऐवजी भाजपकडून शाहू उद्योग समूहाचे नेते समरजीतसिंह घाटगे यांचे नाव पुढे येत आहे. या बद्दल विचारणा केली असता मुश्रीफ यांनी सध्या तरी संजय मंडलिक हे उमेदवार आहेत. आणखी कोणाचे नाव असेल तर मला माहित नाही, असे म्हणत त्यांनी राजकीय प्रतिस्पर्धी घाटगे यांच्या नावाबद्दल थंड प्रतिसाद नोंदवला. लोकसभा निवडणुकीबाबत दिल्लीतील बैठकीत आमचे नेते अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस गेले आहेत. ते महायुतीकडून कोणाला उमेदवारी देतील त्याच्या पाठीशी राहू, असे ते म्हणाले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur guardian minister hasan mushrif criticizes satej patil on the issue of shahu maharaj css
First published on: 09-03-2024 at 16:19 IST