तीन आमदारांवर कारवाईची जिल्हाप्रमुखांची मागणी

शिवसेनेमध्ये मातोश्रीवरून काही आदेश निघतो का, असेल तर त्याची नेमकी प्रक्रिया कोणती, आदेशाचे उल्लंघन झाल्यास कोणती किंमत चुकवावी लागते, अशा अनेक प्रश्नांचे  काहूर सध्या कोल्हापूर शिवसेनेत माजले आहे. जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपदाची संधी स्थानिक शिवसेना आमदार आणि काही नेत्यांमुळे गमावली गेल्याची खंत शिवसनिकांमध्ये बळावली आहे. ऐन मोक्याच्या क्षणी भाजपला साथ दिल्याबद्दल तीन शिवसेना आमदारांवर कारवाई करावी, अशी तक्रार तिन्ही जिल्हाप्रमुखांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे एकमुखाने केली आहे. या तक्रारीची ‘मातोश्री’वर कशी दखल घेतली जाणार याची चिंता तिन्ही आमदारांमध्ये निर्माण झाली आहे. या मुद्दय़ावरून शिवसेनेत एकवाक्यतेचा अभाव असल्याची आणि सोयीचे घोडे दामटण्याची प्रवृत्ती पुन्हा एकदा उघड झाली असून, पक्षातील वाढती अनागोंदी मारक ठरण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत.  कोल्हापूर जिल्हा परिषदेत ६७ पकी १० जागा मिळवणारा शिवसेना हा पक्ष निकाल लागल्यापासून ‘किंगमेकर’ बनला होता. ज्यांना सेनेचा पािठबा त्यांच्याकडे अध्यक्षपदाची खुर्ची असे चित्र होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला तर शिवसेनेचाच अध्यक्ष होण्याइतपत परिस्थिती बदलली होती. येथेच शिवसेनेतील सुसंवाद, एकवाक्यतेचा अभाव उघडा पडला आणि मिनी मंत्रालयाचा लाल दिवाही दुरावला.

भाजपला दूर ठेवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेतही दोन्ही काँग्रेससोबत सोयरीक करण्याचा शिवसेनेने निर्णय घेतला आहे. तसे स्पष्ट संकेत ‘मातोश्री’तून मिळाले असल्याचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी घोषित केले. शिवसेना कोल्हापूर जिल्हय़ात दोन्ही काँग्रेसचा पािठबा घेत सत्ता स्थापन करेल, असेही स्पष्ट करण्यात आले.

तीन आमदारांचा सवतासुभा

काँग्रेससोबत जाण्याचा शिवसेनेचा निर्णय चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील, डॉ. सुजित मिणचेकर यांनी राजकारणातील वैयक्तिक रागलोभातून धुडकावून लावला. त्यांनी आपले ७ सदस्य भाजपच्या छावणीत नेऊन सोडल्याने जिल्हा परिषदेत प्रथमच ‘कमळ’ फुलले. तिन्ही आमदारांच्या या निर्णयामुळे शिवसेनेतील वादाने उचल खाल्ली आहे. संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव या तिन्ही जिल्हाप्रमुखांनी ‘मातोश्री’कडे खलिता पाठवत ‘मातोश्री’च्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तीनही आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तिन्ही जिल्हाप्रमुखांनी एकमुखाने केलेल्या या मागणीमागे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांचा हात असल्याचा सूर प्रतिस्पर्धी गटातून व्यक्त होत आहे.

कारवाईचे धाडस दाखवणार का?

‘मातोश्री’च्या आदेशाचे उल्लंघन, असा भावनात्मक पवित्रा घेतला असल्याने शिवसेनेतील तिन्ही आमदारांवरील कारवाईकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष न जाईल तरच नवल! कारण उभय काँग्रेसने शिवसेनेतील मतांची फूट पाहून शिवसेनेलाच अध्यक्षपद देण्याची तयारी दाखवली होती. तिघांची एकी कायम राहिली असती तर मिनी मंत्रालयाचा लाल दिवा शिवसेनेकडे येण्याची ऐतिहासिक कामगिरी फत्ते झाली असती. याचे दु:ख, वेदना, संताप शिवसेनेत दिसतो. त्यावरून तिन्ही आमदार टीकेचे कारण ठरले आहेत, पण हेच आमदार ‘शिवसेनेचा पािठबा देण्याचा निर्णय आम्हाला कळलाच नाही’ अशा विश्वामित्री भूमिकेत आले आहेत. इतके सारे घडवून त्यांच्यावर कारवाई होण्याबाबत मात्र साशंकता आहे. टोकाचा निर्णय घेतल्यास हे आमदार हाती कमळ धरण्याची भीती शिवसेनेतूनच व्यक्त होत आहे. असे घडणे शिवसेनेला राजकीयदृष्टय़ा परवडणारे नाही. त्यामुळे मातोश्रीवरून कारवाईची तलवार खरीच उगारली जाणार का, ‘मातोश्री’च्या आदेश उल्लंघनाची नेमकी काय दखल घेतली जाणार, याचे शिवसेनेच्या राजकीय वाटचालीवर दूरगामी परिणाम होणार हे मात्र नक्की!