ऊस दराच्या वादाचा फड पेटला असताना त्यात आता बळीराजा शेतकरी संघटना व शेतकरी कामगार पक्षानेही उडी घेतली आहे. साखर कारखान्यांनी प्रतिटन ३ हजार ५०० रुपये दर जाहीर केल्याशिवाय शेतकऱ्यांनी उसाला कोयता लावू देऊ नये, असे आवाहन बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केले आहे. तर, तीन हजार रुपये पहिली उचल द्यावी, अंतिम दर  किमान प्रतिटन ३ हजार ७०० रुपये मिळावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे.

खासदार राजू शेट्टी यांनी यंदा प्रतिटन ३ हजार २०० रुपये पहिली उचल मिळावी अशी मागणी केली. त्यानंतर आता वेगवेगळ्या संघटना आपल्यापरीने दराचे गणित मांडू लागल्या आहेत. बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पाटील म्हणाले, ऊसक्षेत्र घटले असून साखरेचे दर ५० रुपयांवर जाणार आहेत, तरीही कारखानदार चांगला दर देण्याच्या मन:स्थितीत नाहीत. शासनही यासाठी फार काही करणार नाही. मागच्या सरकारने शेतकऱ्यांना लुटले तसेच हे सरकार  वेगळी भूमिका घेत नाही. शेतकऱ्यांनीच साडेतीन हजार दराशिवाय आपला ऊस घालायचा नाही, असा निर्धार करावा. संघटना त्यांच्या पाठीशी राहील. कऱ्हाड आणि परिसरात गुऱ्हाळघरांना २ हजार ८०० रुपये दराने ऊस घातला जात आहे. अशा परिस्थितीत आपल्या उसाला अधिक साडेतीन हजार रुपये भाव देण्यासाठी कारखानदारांना कोणतीही अडचण येणार नाही.

शेट्टींवर टीकास्त्र

आजवरच्या साखर परिषदेंत राजू शेट्टी हे ऊस दरासाठी सरकारला अंतिम इशारा देऊन आंदोलनाची  तारीखही जाहीर करून ठरल्याप्रमाणे ते व्हायचे.  या वेळी शेट्टी यांनी कोणताही पर्याय शासनापुढे ठेवला नाही. तसेच आंदोलनाची तारीखही जाहीर केली नाही. शेट्टी हे सत्ताधार्जणिे झाल्यानेच त्यांची शेतकरी बांधिलकी ढिली पडली आहे.

३ हजार ७०० रुपये अंतिम दर द्यावा

गतहंगामात प्रतिकूल हवामानामुळे साखर उतारा घटल्याने  सरासरी एफआरपीमध्ये एक टक्क्याने घट होऊन प्रतिटन २४२ रुपये फटका बसणार आहे.  ऊसतोडणी कामगारांच्या मजुरीत २० टक्के, तर मुकादमांच्या मजुरीमध्येही अर्धा टक्का वाढ झाली आहे. यामुळे या हंगामात तीन हजार पहिली उचल व ३ हजार ७०० रुपये अंतिम दर द्यावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सहचिटणीस माजी आमदार संपतराव पवार यांनी शर्मा यांच्याकडे केली.

शर्मा यांनी, १४ दिवसांत एकरकमी एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे; पण गतवर्षी तडजोड झाल्याने दोन हप्ते झाले. यंदा मात्र एकरकमी एफआरपी कारखानदारांना द्यावीच लागेल, असे सांगितले. या वेळी संजय डकरे, सरदार पाटील, अंबाजी पाटील, केरबा पाटील उपस्थित होते.