लाखो भाविकांकडून होणारा ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा अखंड गजर , गुलाल खोबऱ्याची उधळण करीत, हलगीच्या तालावर सासनकाठय़ा नाचवत दख्खनचा राजा श्री जोतिबाची यात्रा गुरुवारी भक्तिमय वातावरणात पार पडली. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा आदी राज्यातून आलेल्या सहा लाखावर भाविकांची उपस्थिती होती. यात्रेवर दुष्काळाचे सावट जाणवत होते. महाराष्ट्रात यंदा चांगला पाऊस पडू दे आणि राज्याला भेडसावणारा दुष्काळ कायमचा संपू दे, असे साकडे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोतिबाला घातले.
जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात पालखी मिरवणुकीला ढोल-ताशे व हलगीच्या निनादात प्रारंभ झाला. उंच सासनकाठ्या नाचवत व गुलाल-खोबरे उधळत भाविक देहभान विसरुन मिरवणुकीत सहभागी झाले होते. विविध रंगांच्या सासनकाठ्यांमुळे जोतिबा मंदिराची शोभा वाढली.महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटक व आंध्रप्रदेशातून गेल्या तीन दिवसांपासून जोतिबा डोंगरावर दाखल झालेल्या लाखो भाविकांच्या उपस्थितीत चत्र यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. जोतिबाच्या मूर्तीला पहाटे अभिषेक, शासकीय पूजा, दुपारी मानाच्या सासन काठ्यांची मिरवणूक, सायंकाळी पालखी सोहळा असा यात्रेतील मुख्य कार्यक्रम पार पडल्यानंतर जोतिबाचे दर्शन व सासन काठ्यांच्या मिरवणुकीसह पालखीवर गुलाल खोबरे उधळून भाविकांनी परतीची वाट धरली.
कोल्हापूर जिल्ह्य़ातील श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे श्री जोतिबा देवाच्या चत्र यात्रेनिमित्त पालकमंत्री पाटील यांनी श्री जोतिबाचे दर्शन घेऊन पूजा केली. त्यांच्या हस्ते सातारा जिल्ह्य़ातील निनाम पाडळी येथील मानाच्या सासनकाठीचे पूजन करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, की नृसिंहवाडी येथील कन्यागत महापर्वासाठी १२१ कोटीचा आराखडा शासनाने मंजूर केला आहे. श्री महालक्ष्मी विकास आराखडाही तयार करण्यात आला आहे. याच पध्दतीने श्री क्षेत्र जोतिबा विकास आराखडा तयार करण्यात येत असून या आराखड्यानुसार कार्यवाही होईलच, तथापि दर्शन मंडपासाठी आमदार निधीतून निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न राहील.
सुलभ वाहतूक व्यवस्था
यात्रेतील गर्दी लक्षात घेऊन पन्हाळा पोलिस व कोल्हापूर शहर वाहतूक शाखेमार्फत वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात आले होते. येण्या-जाण्यासाठी एकेरी मार्ग आणि गर्दीच्यावेळी डोंगर परिसरात वाहने सोडणे बंद केल्यामुळे मंदिराच्या परिसरात भाविकांना वाहनांचा फारसा त्रास जाणवला नाही. सायंकाळी पालखी सोहळा झाल्यानंतर भाविक परतीच्या मार्गाला लागल्याने जोतिबा डोंगर ते कोल्हापूर तसेच गिरोली माग्रे कुशिरे व टोप तसेच वाघबीळ माग्रे कोल्हापूर या मार्गात वाहनांची मोठी गर्दी झाली होती, पण कोठेही कोंडी झाली नाही.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Apr 2016 रोजी प्रकाशित
हलगीच्या तालावर, सासनकाठय़ा नाचवत दख्खनच्या राजाची उत्साहात यात्रा
सहा लाख भाविक ; ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा अखंड गजर
Written by लोकसत्ता टीम

First published on: 22-04-2016 at 03:30 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jyotiba festival celebrated in devotional environment