कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत आणखी तीन मतदारसंघ वाढणार आहेत. त्यामुळे वाद विसरून राहुल पाटील – चंद्रदीप नरके हे मित्र बनतील, असे मत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे व्यक्त केले.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तरी शिंदे सेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्याशी राजकीय स्पर्धा कायम राहणार असल्याचे विधान राहुल पाटील यांनी केले होते. त्यावर मुश्रीफ यांनी वरील मत व्यक्त करतानाच आपला गट टिकवण्यासाठी सगळ्यांकडूनच अशी वक्तव्ये होत असतात, अशी टिप्पणी केली.
राहुल पाटील, राजेश पाटील बंधूंसह दिवंगत आमदार पी. एन. पाटील गटाच्या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला हत्तीचे बळ मिळणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत युतीचा झेंडा फडकवण्यास मोठा हातभार लागणार आहे, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
सतेज सल्ला
या पक्षप्रवेशामुळे आमदार सतेज पाटील यांनी इतकेही हळवे होऊ नये. दोन्ही मुलांना सहकार्य करता येणार नसेल, तर अपशकुन करून अडथळा आणू नये. त्यांना आशीर्वाद द्यावा, असा सल्लाही मुश्रीफ यांनी दिला. शक्तिपीठ महामार्गाविरोधात १५ ऑगस्ट रोजी शेतशिवारात ध्वजारोहण करण्यासाठी, खर्डा-भाकर खाण्यासाठी सतेज पाटील यांनी नितीन राऊत यांनाही बोलवायला हवे होते, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.
कोणत्याही सनदी अधिकाऱ्यांनी शासकीय परदेश दौरा करायचा झाल्यास मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतलीच पाहिजे, या फडणवीस यांच्या भूमिकेचे मंत्री यांनी जोरदार समर्थन केली. खाजगी दौरा करतानासुद्धा अशी परवानगी घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.
राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपाबद्दल मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, त्यांना प्रतिज्ञापत्र देण्यासाठी निवडणूक आयोगाने सांगितलेले आहे. दरम्यान; कोल्हापूर जिल्ह्यात मतचोरी झाल्याचा आरोप आजतागायत कुठेही झालेला नसल्याकडेही मुश्रीफ यांनी लक्ष वेधले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याशी चर्चा करून शहरातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करु. हे काम पावसाळा झाल्यानंतर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाहीह मंत्री मुश्रीफ यांनी दिली.
सरन्यायाधीश माननीय भुषण गवई यांच्या माध्यमातून लवकरच खंडपीठही साकारत आहे. यामुळे कोल्हापूरात विकासाचे महाद्वार उघडले जाणार असून जिल्हयाचा २० टक्के जीडीपी वाढणार आहे. त्यामुळे शहराची हद्दवाढ करणे, शेंडा पार्क येथील जागेत इमारत, यासह आयटी पार्क निर्माण करण्याची गरज असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.