कोल्हापूर : गेल्या मंगळवारी कोल्हापुरात बिबट्याच्या हल्ल्यात चौघेजण जखमी झाले असताना रविवारी कागल तालुक्यातील दिंडनेर्ली गावात कोल्ह्याच्या हल्ल्यात एका महिलेसह चौघे जण जखमी झाल्याचा प्रकार पुढे आला आहे.

हा प्रकार रविवार पहाटे तीन ते सकाळी आठच्या सुमारास घडला. त्यांना येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून येथील पोलीस चौकीत घटनेची नोंद झाली आहे.

दिंडनेर्ली येथील आकाश चंदर शिंदे (वय ३२) व पाडुरंग बंडू बोटे (वय ७०) हे दोघे जण वैरण आणण्यासाठी शेतात गेले होते. त्यांना कोल्ह्याने चावा घेऊन जखमी केले. तसेच विक्रम दिनकर पाटील (वय ७०) यांचे शेतात घर आहे. त्यांना गावात शिरलेल्या कोल्ह्याने चावा घेऊन जखमी केले. बेबीताई यशवंत शिंदे (वय ५०) या कपडे धुण्यासाठी ओढ्याजवळ गेल्या असता तेथे कोल्ह्याने चावा घेऊन त्यांना जखमी केले.