कोल्हापूर : नव्या दमाचे कुस्तीगीर तयार करणारे वस्ताद, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे मुख्य संरक्षक बाळ तथा बाळासाहेब राजाराम गायकवाड यांचे मंगळवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. कुस्तीतील भीष्माचार्य असा त्यांचा लौकिक होता.

गायकवाड यांनी लहानपणापासून कुस्तीचे आकर्षण होते. तरुणपणी त्यांनी अनेक मैदाने जिंकली. पण पुढे कुस्ती करण्याऐवजी ती वाढावी याकरिता त्यांचे प्रयत्न सुरू राहिले. यातूनच माजी मंत्री श्रीपतराव बोंद्रे व बाळ गायकवाड यांनी १९६० लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या सहकार्याने कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना केली . नवी दिली येथील विख्यात मल्ल सतपाल यांना पराभूत करणारे युवराज पाटील यांचे ते मार्गदर्शक होते.

हेही वाचा >>> इचलकरंजीतील पाणी प्रश्नाला राजकारणाची उकळी

वार झेलले

कुस्ती संघटनाच्या वादातून दहा वर्षापूर्वी चाकू हल्ला झाल्याने ते जखमी झाले होते. मल्लविद्या वाढविण्यासाठी त्यांनी सर्वस्वाचा त्याग करून तालमीत राहणे पसंत केले होते. गेले काही दिवस त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यांच्या मागे भाऊ, बहिण , पुतणे असा परिवार आहे. पुनाळ (ता. पन्हाळा) या गावी अंत्यविधी करण्यात येणार आहे.

कुस्तीचा वारसा

बाळ गायकवाड यांचे आजोबा गणपतराव गायकवाड वस्ताद होते. वडील राजाराम हे मल्ल  होते. त्यांनी मोतीबाग तालमीत कुस्तीचे धडे घेतले. या तालमीच्या मालकी हक्कासाठी त्यांनी १३ वर्षे न्यायालयीन लढा देताना त्यांना खूपच मानसिक त्रास सहन करावा लागला होता. दावा जिंकल्यानंतर आयुष्याचे सार्थक झाले अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनोखे पालकत्व

खरी कॉर्नर येथे तालमीचे कार्यालय असताना जवळच एक मोलकरीण लहान मुलासह राहत होती. तिचा मृत्यू झाल्यावर त्या मुलाची जबाबदारी स्वीकारून त्यास पदवीधर करून मराठा बॅंकेत कारकून केले. नंतर तो शाखा व्यवस्थापक बनला. प्रसिद्धी नशा असते ती डोक्‍यात गेली की ती दारूपेक्षा वाईट’, असे ते सांगत असत.