कोल्हापूर : माणगांव (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीच्या विशेष ग्राम सभेमध्ये ‘आमचे आई-वडील आमची जबाबदारी’ नावाची नावीन्यपूर्ण योजना राबवण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला. यानुसार गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीची काळजी घेण्याच्या विविध उपाययोजना राबवल्या जाणार असून, सर्वाधिक गरजेच्या मधुमेह व रक्तदाब विकारावरील औषधे मोफत पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माणगांव ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या या उपक्रमाची सर्वत्र चर्चा आहे. ज्येष्ठांसाठी अशी योजना सुरू करणारी देशातील ही पहिली ग्रामपंचायत असल्याचाही माणगावतर्फे दावा करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आज माणगांव ग्रामपंचायतीने गावातील निराधार नागरिकांसाठी ‘आमचे आई-वडील आमची जबाबदारी’ या आगळ्यावेगळ्या योजनेची सुरुवात करण्यात आली. याअंतर्गत गावातील ६५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना तहयात मधुमेह व रक्तदाब विकाराची औषधे दरमहा एक तारखेला माणगांव ग्रामपंचायत कार्यालयमधून मोफत देणार आहे. या योजनेचा खर्च ग्रामनिधीमधून करण्यात येणार आहे.
या योजनेमध्ये ६५ वर्षांवरील मुले नसणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना, विवाहित पण उत्पन्नाचे साधन नसणाऱ्या मुली असतील तर अशाही ज्येष्ठ नागरिकांचा सर्वे करून त्यांनाही अशा प्रकारची औषधे निःशुल्क देण्यात येणार आहेत. प्राथमिक माहितीनुसार गावात अशा प्रकारचे सुमारे १२५ लाभार्थी असतील, अशी माहिती सरपंच राजू मगदूम यांनी दिली.
यापूर्वीही माणगाव ग्रामपंचायतीने मयत अनुदान, कन्यारत्न योजना, माहेरची साडी योजना, लेक लाडकी माझ्या गावची या सर्व योजना यशस्वीरित्या चालू ठेवल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून ही नवीन योजना नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास सरपंच राजू मगदूम यांनी योजना जाहीर करताना व्यक्त केला.
आजच्या विशेष गाव सभेमध्ये ठराव करून या नवीन योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेसाठी आशासेविका व अंगणवाडी सेविका यांनी केलेल्या सर्वेनुसार १२५ ज्येष्ठ नागरिक पात्र असतील, अशी लोकोपयोगी नावीन्यपूर्ण योजना सुरू करणारी माणगाव ग्रामपंचायत ही देशातील पहिली ग्रामपंचायत असणार आहे.
यावेळी संपर्क अधिकारी म्हणून एन. आर. रामान्ना, विस्तार अधिकारी पं. स. हातकणंगले उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ नेते माजी सरपंच अनिल पाटील, आय. वाय. मुल्ला, विद्या उमेश जोग सरपंच व ग्रामपंचायत सदस्य अख्तर हुसेन भालदार, अभिजित घोरपडे, प्रकाश पाटील, अमरसिंह उपाध्ये, नितीन कांबळे, वसुधा दत्तात्रय बन्ने, संध्याराणी पोपट जाधव, संघमित्रा मधुकर माणगावकर, गीतांजली संजय उपाध्ये, स्वप्निला अविनाश माने, रमिजा शकील जमादार व तंटामुक्ती अध्यक्ष सुनील मन्ने, ग्रामपंचायत अधिकारी के. एम. बाबर, गाव तलाठी एस. एम. शिंदे यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस आशा वर्कर, आरोग्यसेवक व गावातील नागरिक उपस्थित होते.