कोल्हापूर : गुरुजन आणि गुरुस्थानी असलेल्या वयोवृद्धांना राजधानी मुंबई, विधानसभा, मंत्रालय, आरोग्यमंत्र्याचे कार्यालय आणि महत्त्वाची पर्यटन स्थळे अशी हवाई सैर घडवली गेली. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या रूपाने गुरुदक्षिणा देणारी ही अनोखी सफर घडली गेली. गुरुजनांनीही शिष्योत्तम्माकडून मिळालेल्या अनुभवाबद्दल आनंद व्यक्त करीत शुभाशीर्वाद दिले.
राधानगरी -भुदरगड तालुक्याचे आमदार राहिलेले प्रकाश आबिटकर सलग तिसऱ्यांदा निवडून आले. त्यांच्याकडे राज्याच्या आरोग्यमंत्री आणि कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. मंत्री झाल्यानंतर त्यांनी आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूंचा आणि मतदारसंघात गुरुस्थानी असलेल्या वयोवृद्धांना एक अनोखी भेट द्यायचे मनोमनी ठरवले होते. त्यासाठी ते एका चांगल्या मुहूर्ताच्या शोधात होते. ती त्यांना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने चालून आली.
त्यांनी मतदारसंघातील १७ वयोवृध्द गुरू व गुरुस्थानी असणाऱ्यांना कोल्हापूर विमानतळावरून विमानाने मुंबईला नेले. आणि असाच प्रवास करून हे सर्व गुरुजन आज मंत्री आबिटकर यांच्यासमवेत कोल्हापूर विमानतळावर पोहोचले. हा एकूणच अनुभव आनंददायी होता, अशा भावना गुरुजनांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केल्या.
विधानसभेचे कामकाज थेट पाहायला मिळाले. नागपूरच्या महापुराचा प्रश्न उपस्थित केला. त्याला मुख्यमंत्र्यांकडून कसे उत्तर दिले गेले हे ऐकले, ते अभ्यासात भर घालणारे होते, असे एकनाथ चौगुले( राशिवडे )यांनी सांगितले. विधिमंडळामध्ये आर्थिक सुधारणांबाबत झालेली चर्चा उद्बोधक वाटली, असे अंकुश चव्हाण (गारगोटी) यांचे म्हणणे होते.
तर आमचे मंत्री प्रकाश आबिटकर यांचे प्रत्येक काम हे अचूक असते. प्रत्येक गोष्ट ते लक्षपूर्वक करीत असतात. लोकांनी सांगितलेले प्रश्न ते मनापासून ऐकतात. हे त्यांच्या कार्यालयात राहून प्रत्यक्ष अनुभवता आले, असे निरीक्षण दत्तात्रय उगले (मडीलगे) यांनी नोंदवले.
आयुष्यात विमानात बसायची संधी मिळाली नाही, पण ती प्रकाश आबिटकर यांच्यामुळे मिळाली. शिवाय मुंबईच्या नवलकथा अनेकदा ऐकल्या होत्या. त्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने भरून पावलो, असेही मंडळींनी सांगितले.