कोल्हापूर : येथील पद्माराजे उद्यानातील वृक्षतोड कत्तलीचे प्रकरण महापालिकेचे पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रंबरे यांना चांगलेच भोवले आहे. फांद्या तोडण्यास मान्यता दिली असताना बुडक्यांसह झाडांची वृक्षतोड केल्यामुळे पर्यावरण अधिकारी तथा प्रभारी उद्यान अधीक्षक समीर वसंत व्याघ्रांबरे यांना महापालिका सेवेतून तात्काळ निलंबित करण्याचे आदेश महापालिकेच्या प्रशासकता आयुक्त के. मंजू लक्ष्मी यांनी दिले आहेत. यामुळे या प्रकरणाची आता चांगली चर्चा होत आहे.
रंकाळा तलावा समोर असलेल्या पद्माराजे उद्यान परिसरातील दोन रबर वृक्षांची व इतर वृक्षांची फांद्या तोड करून मिळावी असा अर्ज तेथील नागरिक व संघटनांनी उद्यान विभागाकडे २४ जानेवारी रोजी दिला होता. वृक्ष प्राधिकरण समितीने समोर हा अर्ज आला असता फांद्या तोड करण्यास मान्यता देत मान्यता देण्यात आली पण वृक्षतोड नामंजूर करण्यात येत आहे, असा निर्णय दिला होता.
हेही वाचा…कोल्हापूर: १०० कोटींची रस्त्यांची कामे रखडल्याने नागरिक कृती समितीचे आंदोलन
तथापि समीर व्याघ्रांबरे यांनी वृक्ष समितीच्या निर्णयाप्रमाणे कार्यवाही न करता बुडक्यासह झाडांची वृक्षतोड केल्याचे प्रकरण निदर्शनास आले. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील १९८० मधील नियम आठ अन्वये असलेल्या तरतूद अनुसरून निलंबित करण्यात आले आहे.
कारवाई कोणती?
व्याघ्रांबर यांना निलंबित करून त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. निलंबन कालावधी मध्ये समीर व्याघ्रांबरे यांचे मुख्यालय कोल्हापूर राहील. त्यांना मुख्यालय सोडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यांनी दररोज उपायुक्त कार्यालयामध्ये हजेरी देण्याचे आहे. विभागीय चौकशी नियम अन्वये व्याघ्रंबरे यांना इतरत्र नोकरी, उद्योग, व्यवसाय करीत नसल्याचे प्रमाणपत्र प्रति महिना आस्थापना विभागाला द्यावे लागणार आहे. या आदेशाचा अंमल सत्वर होणार असून त्याचा दाखला सेवा पुस्तकात नोंदवण्याचे आदेश प्रशासकांनी दिले आहे.
हेही वाचा…कोल्हापूर : इचलकरंजीत तरुणाचा खून; ८ जणांवर गुन्हा दाखल
तक्रारीची दखल
दरम्यान पद्माराजे उद्यानातील वृक्षतोड प्रकरण पुढे आल्यानंतर त्याविरुद्ध वृक्षप्रेमी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. महापालिका प्रशासनाच्या अनागोंदी कारभारावर ताशेरे ओढले होते . वृक्षतोड समितीचे सदस्य, वनस्पती तज्ञ डॉक्टर मधुकर बाचूळकर यांनी कोल्हापूर शहरांमध्ये बिनदिक्कत वृक्षतोड होत असताना पर्यावरण अधिकारी काहीच कारवाई करत नसल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला होता. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली होती. तर वृक्ष प्राधिकरण समितीचे दुसरे सदस्य पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांनी या एकूणच कारभारावर ताशेरे ओढत समीर व्याघ्रंबरे यांच्या बेकायदेशीर कारभाराचा पंचनामा करणारे पत्र महापालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार त्यांना निलंबित करण्यात आले असून त्याचे वृक्षप्रेमी नागरिकांनी स्वागत केले आहे.
हेही वाचा…कोल्हापूर : आवाडे समर्थक सुरज राठी याच्यावर खुनी हल्ला; दोघे अटकेत
अपेक्षा कोणत्या?
यापुढे तरी महापालिका प्रशासनाने उद्यान विभागाने बेकायदेशीर वृक्षतोडीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. शहरात वृक्षांची निगा, संगोपन, संवर्धन व्यवस्थित व्हावे, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी वृक्षप्रेमी अमोल बुड्ढे यांनी केली आहे.