कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील प्रमुख स्पर्धक असलेले काँग्रेसचे जयश्री जाधव आणि भाजपचे सत्यजित कदम यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. सत्यजित कदम यांनी मोठी मिरवणूक काढून लक्ष वेधून घेतले. जाधव यांचा अर्ज दाखल करण्यावेळी मंत्र्यांची लक्षणीय उपस्थिती होती. दोघा प्रमुखांच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमुळे आज वातावरण निवडणूकमय झाले होते.

 पोट निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले असताना आज प्रमुख दोघा उमेदवारांनी अर्ज दाखल केले. प्रथम सत्यजित कदम यांचा अर्ज भरण्यासाठी दसरा चौकातून मिरवणूक निघाली. पारंपरिक वाद्यांचा निनाद, जयघोष, भाजपचे झेंडे आणि कदम यांच्या प्रतिमा घेतलेले नागरिक, कार्यकर्ते असे मिरवणुकीचे जल्लोषी स्वरूप होते. रॅलीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, आमदार प्रकाश आवाडे आदी होते. माजी खासदार धनंजय महाडिक यांनी कार्यकर्त्यांसमवेत चालत जाण्यास महत्त्व दिले.

काँग्रेससाठी मंत्र्यांची हजेरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी शक्ती प्रदर्शन टाळून साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हाधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर प्रमुख कार्यकर्ते जमले होते. तेथून पदयात्रेने सर्व जण जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आले. काँग्रेस, मित्र पक्षांचे झेंडे घेऊन उमेदवाराचा जयघोष करीत पदयात्रा निघाली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, पालकमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे नेते उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी संचालक राजेश क्षीरसागर आदींचा समावेश होता.