दयानंद लिपारे
कोल्हापूर : उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीची पण राज्यातील प्रश्न, भ्रष्टाचारी कारभार, ईडी कारवाई अशा मुद्दय़ांमुळे प्रचाराची राळ उडाली आहे. निवडणुकीतील रंगत वाढत चालली असताना अखेरच्या टप्प्यात बडय़ा नेत्यांच्या सभांमुळे वातावरण आणखीन ढवळून निघणार आहे. मतदारांची मर्जी राखण्यासाठी मुक्तहस्ते भेट-वस्तू पुरवण्यात कोणीही मागे राहिलेले नाही. पंढरपूरची पोटनिवडणूक जिंकल्याने भाजपला विठूरायाप्रमाणेच कोल्हापूरची महालक्ष्मी पावण्याचा आशावाद वाटत आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा गेल्या ४० वर्षांचा इतिहास हा कॉंग्रेस विरोधातील असल्याचे सांगतो. शेकाप, जनता दल आणि पाच वेळा शिवसेनेचे आमदार निवडणून आल्याने कॉंग्रेसला वातावरण पूरक नव्हते. तरीही करवीरनगरीत गतवेळेसह कॉंग्रेसचा तिरंगा तीनदा फडकला असून सध्या जिल्ह्यात कॉंग्रेसचे सर्वाधिक ६ आमदार निवडून आले आहेत.
पाटील विरुद्ध पाटील सामना
पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी येथे काँग्रेसकडून निवडणूक लढवलेले सत्यजित कदम भाजपकडून रिंगणात आहेत. जाधव – कदम यांच्यादृष्टीने निवडणुकीला जितके महत्त्व आहे त्याहून अधिक आजी झ्र् माजी पालकमंत्र्यांच्या दृष्टीने आहे. भाजपने राज्यात १०५ आमदार निवडून आणले असले तरी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जिल्ह्यात पक्षाची पाटी कोरी आहे. यानिमित्ताने ती पुसून काढण्याचा आमदार पाटील यांचा प्रयत्न असल्याने कंबर कसून जोरदार तयारी केली आहे. जिल्ह्यात विधानसभा, विधान परिषद, महापालिका, जिल्हा परिषद, गोकुळ, जिल्हा बँक येथे वर्चस्व मिळवत सतेज पाटील यांची अजिंक्ययात्रा सुरू आहे. निवडणूक यशाची पुनरावृत्ती करून मंत्रिमंडळात वरचे स्थान मिळवण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. साहजिकच आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये प्रचारात वादाचे खटके सातत्याने उडत आहेत. त्यातून विचारांची पातळी खाली घसरत आहे. निवडणुकीत ‘लक्ष्मीदर्शन’ होत नाही असा प्रकार जवळपास विरळा. तरीही येथे मतदारांनी पैसे घेतल्यास ईडी अधिकारी चौकशी करतील असा इशारा भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. त्यावरून वातावरण तापवण्याचा प्रयत्न ‘मविआ’ कडून सुरू न झाला तरच नवल. या जोडीलाच सतेज पाटील झ्र् धनंजय महाडिक असा पारंपरिक वादाचा आणि त्यातून निर्माण झालेल्या राजकीय प्रतिष्ठेचा मुद्दाही संघर्षांत रंग भरत आहे.
प्रतिष्ठेचे रण
कोल्हापुरातील निवडणुकीचा ज्वर खोलवर भिनला आहे. भाजप झ्र् मविआ या दोन्हीकडील नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपांची राळ उठवली असल्याने वातावरण गढूळ होत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या सभेतील दगडफेकीचा प्रकार, भेटवस्तू वाटपाचे नियोजन, डिजिटल पेमेंटद्वारा पैसे वाटण्याची तयारी हे मुद्दे प्रचारात उघडपणे मांडले जात असल्याने आजवर निवडणुकीतील पडद्यामागे असणारे प्रकार थेट सामान्य जनतेच्या नजरेत आणले जात आहेत. आपण कशातही कमी नाही हे दाखवून देण्याच्या साम, दाम, दंड, भेद नीतीचा खुलेआम प्रकरा निवडणुकीचे वातावरण कलुषित करत आहे. अखेरच्या टप्पात बडय़ा नेत्यांचा सहभाग आणि त्यातून दिल्या जाणाऱ्या ‘धडय़ा’ मुळे निवडणुकीतील साधन शूचिता मातीमोल ठरण्याची भीती आहे. ही पोटनिवडणूक महाविकास आघाडी आणि भाजप यांच्या दृष्टीनेही प्रतिष्ठेची आहे. आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याचा मुद्दा भाजपकडून ठासून मांडला जात आहे. त्याला आघाडीकडून आमचे सरकार मजबूत असल्याने भाजपने आपल्या यशाची चिंता करावी, असे प्रत्युत्तर दिले जात आहे. परिणामी सत्ताधारी गड राखणार की भाजप झेंडा रोवणार याला कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महाडिक परिवार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.
यशाची समीकरणे
दोन्ही पक्षाकडून काही समीकरणे मांडत निवडणूक जिंकण्याचा दावा हिरिरीने केला जात आहे. जिल्ह्यात काँग्रेसचे वर्चस्व वाढले आहे. राष्ट्रवादीची भक्कम साथ आहे. शिवसेनेच्या गठ्ठा मतांची आशा आहे. खेरीज, दलित,मुस्लीम,डाव्या पक्षांचे पाठबळ, महिलांची सहानुभूती यातून काँग्रेसचा विजय सुकर आहे, असे गणित मांडले जात आहे. चार राज्यातील निवडणुकीत सत्ता मिळवल्यानंतर तरुणाईमध्ये भाजप विषयीचे आकर्षण दिसत आहे. काश्मीर फाईल्स, कडवट हिंदूत्वाची मांडणी, मविआ शासनाची निष्क्रियता आणि कोल्हापूरचा रेंगाळलेला विकास यावर टीकेचे प्रहार केले जात आहेत. यामुळे कधीकाळी जिल्ह्यात मर्यादित अस्तित्व असलेला भाजपचा प्रभाव निवडणुकीत दिसत आहे. पोटनिवडणुकीत भाजपला पंढरपुरातील ‘विठोबा’ प्रमाणे ‘महालक्ष्मी’ प्रसन्न होण्याचा आशावाद आहे. इकडे कॉंग्रेसच्या गोटात देगलूर प्रमाणे कोल्हापुराचीही गादी राखू असा आत्मविश्वास आहे. दावे – प्रतिदावे पाहता पोटनिवडणुकीच्या आखाडय़ात कॉंग्रेस की भाजप कोल्हापूर केसरीची गदा मिळवणार या निकालाचा अंदाज वर्तवणे सोपे नाही.