कोल्हापूर : भारतीय कृषी अनुसंधान संस्था दिल्ली व राष्ट्रीय मृदा लवणता अनुसंधान संस्था कर्नाल, हरियाणा यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाल येथे पाच दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी शिरोळ तालुक्यातील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या वतीने राबविण्यात आलेल्या जमीन क्षारपड मुक्त दत्त पॅटर्नची माहिती उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी सादर केली.
त्यांनी श्री दत्त पॅटर्नचे जमीन क्षारपडमुक्तीसाठीचे फायदे, त्याची यशोगाथा, राष्ट्रीय कृषी विकास योजनेमार्फत मिळालेल्या अनुदाना संदर्भातही सविस्तर माहिती दिली. देशभरातील जलसंपदा अधिकाऱ्यांना गणपतराव पाटील यांचे अनुभव मार्गदर्शक ठरले.
राज्यात जलसंपदा विभागामार्फत केले जाणारे जमीन क्षारपड मुक्तीच्या संदर्भात काम, त्यासाठी शासन ८० टक्के आणि शेतकऱ्यांची २० टक्के रक्कम या आधारावर होणारे काम, याची माहिती अधिकारी, अभियंता यांना व्हावी यासाठी शिक्षणाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गणपतराव पाटील हे प्रमुख मार्गदर्शक होते.
श्री दत्त पॅटर्न मध्ये पाणस्थळ आणि क्षारपड जमिनीमध्ये सुमारे दहा हजार एकरामध्ये सच्छिद्र पाईपलाईन निचरा प्रणालीचे काम, चार हजार एकरावरती पिकांचे उत्पादन, शेतकरी एकत्रित येऊन संस्था स्थापन, त्याचे फायदे, राष्ट्रीय कृषी विकास योजनेमार्फत साडेअकरा कोटींचे अनुदान मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न, आर्थिक आणि पर्यावरणीय फायदा, अडचणी आणि मात करण्याचा मार्ग, सेंद्रिय कर्ब वाढीचे प्रयत्न, अशा विविध बाबींवर अनुभवाच्या आधारे पाटील यांनी मार्गदर्शन करून क्षारपडमुक्तीच्या कामाचा विस्तृत आढावा घेतला.
क्षारपड जमीन सुधारणेचा हा प्रकल्प देश व जागतिक पातळीवर राबविण्यात आल्यास शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक संपन्नता येईल, त्याचबरोबर देशाचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल हे अधोरेखित करण्यात आले. या परिसंवादामध्ये क्षारपड मुक्तीचा “श्री दत्त पॅटर्न” कामाचे कौतुक करण्यात आले. तसेच गणपतराव पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
शिरोळ तालुक्यातील श्री दत्त शेतकरी सहकारी कारखान्यांने राबवलेला उपक्रम उल्लेखनीय ठरला आहे. सच्छिद्र जल प्रणालीचा वापर करून क्षारपड जमीन सुधारण्याच्या मोहिमेतून गेल्या ७- ८ वर्षात कोल्हापूर, सांगली, बेळगाव जिल्ह्यात सुमारे ८ हजार एकर शेतीमध्ये पुन्हा हिरवे सोने उगवू लागले आहे. संपन्नतेची पहाट पुन्हा इथल्या क्षितिजावर उगवली आहे. अशा याप्रगोगाला देशात मान्यता तर मिळालीच आहे. आता तर तो आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचला आहे.
मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी झालेले काम, प्राप्त निष्कर्षांचे संगणकीय सादरीकरण केले. कारखान्याचे संचालक इंद्रजीत पाटील, कीर्तीवर्धन मरजे उपस्थित होते.