कोल्हापूर : इटालियन फॅशन शोमध्ये वापरण्यात आलेली चप्पल कोल्हापुरी असल्याचे मान्य करणाऱ्या प्राडा या कंपनीचे वरिष्ठ पदाधिकारी पुढील आठवड्यात महाराष्ट्र भेटीवर येणार आहेत. त्यांनी कोल्हापुरी संग्रह (कलेक्शन) सुरू करण्याचा मानस व्यक्त केला, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर अध्यक्ष ललित गांधी यांनी शुक्रवारी दिली.
महाराष्ट्र चेंबर आणि आंतरराष्ट्रीय लक्झरी फॅशन ब्रँड प्राडा ग्रुप यांच्यात एक उच्चस्तरीय ऑनलाइन बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी ललित गांधी होते. प्राडाकडून लोरेन्झो बर्टेली, ख्रिस्तोफर बग, रोबर्टो मास्सार्डी, फ्रान्सेस्का सेकंदारी, वॅलेंटिना इस्मे पिकाटो यांनी भाग घेतला.
प्राडा समूहाने महाराष्ट्रातील पारंपरिक कारागिरांशी दीर्घकालीन सहकार्य करण्याचा हेतू व्यक्त केला. त्याचे एक पथक कोल्हापुरी चप्पल व इतर हस्तकला उत्पादकांना पुढील आठवड्यात महाराष्ट्रात भेटणार आहे. प्राडाने स्थानिक कारागिरांच्या सहकार्याने मर्यादित आवृत्तीतील ‘मेड इन इंडिया-कोल्हापुरी संग्रह’ सुरू करण्याचा मानस व्यक्त केला.
दिलीप गुप्ता, संगीता पाटील, धनश्री हरदास, नेहा गुप्ता, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, कोल्हापूर जिल्हा फुटवेअर असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पवार, चप्पल विक्रेते गणेश गवळी, रोहित दोईफोडे, राजन सातपुते, विकास आच्छा, ॲड. ईशान पाटकर ॲड. राहुल हिंगमिरे आदींनी चर्चेत भाग घेतला.
महाराष्ट्र चेंबरने या चर्चेत सांस्कृतिक आदर, सह-ब्रँडेड विकास आणि फेअर ट्रेड (न्याय्य व्यापार) या तत्त्वांवर आधारित सहा मुद्दे मांडले. प्राडा ग्रुपने सर्व मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला आणि महाराष्ट्रातील पारंपरिक कारागिरांशी दीर्घकालीन सहकार्य करण्याचा स्पष्ट हेतू व्यक्त केला. महाराष्ट्र चेंबर या दौऱ्याचे समन्वयन करणार असून, नामांकित कारागीर, क्लस्टर आणि प्रमाणित उत्पादकांशी प्राडा टीमची भेट घडवून आणणार आहे.
महाराष्ट्र चेंबरने या वेळी पैठणी, हिमरू, बिछवा/पायल (नुपूर) व स्थानिक भरतकामासारख्या पारंपरिक हस्तकला प्रकल्पांवर सहकार्य करण्याचा प्रस्ताव मांडला. प्राडा ग्रुपने त्यालाही सकारात्मक प्रतिसाद दिला आणि भावी संग्रहात समावेश करण्यासाठी या हस्तकलांचा अभ्यास करण्याची तयारी दर्शवली.
भारतीय व इटालियन कारागिरांमध्ये प्रशिक्षण, ज्ञान व नवकल्पनांची देवाणघेवाण घडवून आणण्यासाठी संरचित प्रशिक्षण व क्रॉस-कल्चरल प्रकल्प राबवण्याचीही चर्चा झाली. डिझाइन इनोव्हेशन आणि शाश्वत उत्पादन हे या सहकार्याचे मुख्य उद्दिष्ट राहणार आहे.
अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, ‘हा उपक्रम पारंपरिक समुदायांसोबत जागतिक फॅशन कशी आदरपूर्वक काम करू शकते, याचे एक मॉडेल ठरू शकतो. प्राडा ग्रुपच्या प्रामाणिकपणाचे आम्ही स्वागत करतो आणि यावर पुढील पायऱ्या उभारण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’