कोल्हापूर : दिवाळी सणातील ग्राहकांची मोठी मागणी लक्षात घेऊन खव्यामध्ये भेसळ करण्याचा प्रकार बुधवारी अन्न व औषध प्रशासनाने उघडकीस आणला. भेसळयुक्त  खवा व पावडर असे सुमारे १८ लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी चार व्यावसायिकांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शिरोळ तालुक्यांमध्ये दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन तसेच दक्षता विभागाच्या पथकाने आज शिरोळ तालुक्यातील चार दुग्ध व्यवसायावर कारवाई केली.

टाकवडे येथील शिवरत्न मिल्क प्रॉडक्ट या फर्ममध्ये ४९९ किलो हवा व त्यामध्ये भेसळ करण्याची ५ टन पावडर जप्त करण्यात आली. याची किंमत सुमारे साडे अकरा लाख रुपये आहे. अकिवाट येथील अमवा मिल्क येथे ४९८ टन खवा (किंमत तीन लाख ७० हजार ) मजरेवाडी येथे गणेश मिल्क प्रॉडक्ट मध्ये ३९१ किलो खवा (किंमत दोन लाख नव्वद हजार) तर बालाजी मिल्क प्रॉडक्ट येथे दोन लाख ३१ हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. जप्त केलेले साहित्य प्रयोगशाळेला पाठवण्यात आले आहे. चारही व्यावसायिकांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत. अहवाल प्राप्त आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.