कोल्हापूर : करवीर निवासिनी महालक्ष्मी देवस्थान परिसर विकास आराखड्याचा १४४५ कोटीच्या प्रकल्पापैकी पहिल्या टप्यातील १४३.९० कोटींच्या विकास कामांच्या आराखड्यास शासनाने गुरुवारी प्रशासकीय मान्यता दिली आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. या निर्णयाचे कोल्हापुरात भाविक, राजकीय पक्षातून स्वागत होत आहे.
कोल्हापूर शहर येथील श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याचा रूपये १४४५.९७ कोटी किमतीचा प्रस्ताव दि.१५.०७.२०२५ रोजी मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीसमोर सादर केला होता. त्यापैकी रुपये १४३.९० कोटीच्या प्रस्तावास उच्चाधिकार समितीने मान्यता दिली.
मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दि.०६.०५.२०२५ रोजी मौजे चौंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथे झालेल्या मंत्रीपरिषदेच्या बैठकीसमोर रुपये १४४५.९७ कोटी किंमतीचा “कोल्हापूर शहर येथील श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याचा” प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. सदर विकास आराखडा रुपये २५.०० कोटी पेक्षा जास्त किंमतीचा असल्याने व त्याची व्याप्ती व स्वरुप नियोजन विभागाच्या दि.०४.०६.२०१५ व दि.१९.०७.२०१६ च्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार असल्याने सदर आराखडा नियोजन विभागामार्फत राबविण्यास मंत्री परिषदेने मान्यता दिली.
सदर बैठकीत “कोल्हापूर शहर येथील श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याच्या” प्रस्तावित रूपये १४४५.९७ कोटी किंमतीच्या विकास आराखड्यास तत्वतः मान्यता देण्यात आली व आराखड्याच्या कार्यवाहीचे टप्पे व कामांचा प्राधान्यक्रम याबाबत उच्चाधिकार समितीने छाननी करुन आराखडा अंतिम करण्यास मान्यता देण्यात आली.
“कोल्हापूर शहर येथील श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याचा” प्रस्ताव मंत्री परिषदेपुढे सादर करतेवेळी सदर आराखड्यास उच्चाधिकार समितीची मान्यता प्राप्त झाली नव्हती. दि.१५.०७.२०२५ रोजी उच्चाधिकार समितीची बैठक पार पडली. सदर बैठकीत उच्चाधिकार समितीने सद्यस्थितीत केवळ पहिल्या टप्प्यातील रुपये १४३.९० कोटींच्या पुरातत्वीय कामांना मान्यता दिली.
भूसंपादनाचे धोरण/कार्यपद्धती ठरविण्यासाठी अपर मुख्य सचिव (नवि-१), नगर विकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करुन समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उर्वरित कामांना मान्यता देण्याची कार्यवाही होईल असे निर्देश दिले. त्यास अनुसरून शासन निर्णयान्वये भूसंपादनाचे धोरण ठरविण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. सदर भूसंपादन समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उर्वरित कामांना उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मान्यता घेण्यात येईल.
सद्यस्थितीत “कोल्हापूर शहर येथील श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखडयातील” रुपये १४३.९० कोटी किंमतीच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील रु.१४३.९० कोटींच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या पहिल्या टप्प्यात पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार मंदिर व परिसराचा जीर्णोद्धार करणे व इतर आवश्यक दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याची माहितीही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.
याबद्दल शिवसेनेच्यावतीने श्री महालक्ष्मी मंदिर घाटी दरवाजा परिसरात वाद्याच्या गजरात साखरे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. एकनाथ शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख रणजीत जाधव, महानगर समन्वयक कमलाकर जगदाळे,सुनील जाधव, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे आदी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.