भाजपचा ११५ सरपंचपदांचा दावा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर जिल्ह्य़ातील ग्राम पंचायत निवडणुकीत प्रमुख पक्षांना संमिश्र यश मिळाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने दक्षिणेकडील तालुक्यात मोठे यश प्राप्त केले आहे, तर भाजपचे ११५ ग्राम पंचायतींमध्ये सरपंच झाल्याचा दावा गोकुळचे संचालक बाबा देसाई यांनी केला आहे. शिवसेना, स्वाभिमानी यांना फारसे यश मिळाले नाही. दिल्लीत झेंडा फडकणाऱ्या महाडिकांना गल्लीत पराभूत व्हावे लागले. आमदार सतेज पाटील यांनी पुलाची शिरोली येथे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडून सत्ता काबीज केली.

विधानसभेची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल सकाळपासून बाहेर पडू लागले. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात १९ ग्रामपंचायत सरपंच निवडणूक निकालापकी काँग्रेसला १३ जागा, भाजपला ४, स्थानिक आघाडीला १, अपक्ष १ जागा मिळाल्या. शेळकेवाडी ग्रामपंचातीचा निकाल सर्वप्रथम लागून काँग्रेस आघाडीचे रंगराव बाबूराव शेळके  विजयी झाले. तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या पाचगाव ग्रामपंचायतीमध्ये सतेज पाटील गटाने सत्ता मिळवली. सांगरूळ येथे नरके गटाच्या महाआघाडीने सत्ता प्राप्त केली. उचगावमध्ये मालू काळे काँग्रेसच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत.

पन्हाळा तालुक्कात माजी मंत्री विनय कोरे यांच्या नेतृत्वखाली १७ ठिकाणी निर्वविाद सरपंच पदाची सत्ता स्थापन केली.आमदार चंद्रदीप नरके,सत्यजित पाटील (सरूडकर) यांच्या गटाने १५ ठिकाणी विजय मिळविला. तालुक्यात लक्षवेधी ठरलेल्या दरेवाडी, आसुल्रे येथे सभापती पृथ्वीराज सरनोबत यांच्या गटाला जबर धक्का देत बाबासाहेब पाटील (आसुल्रेकर) यांच्या गटाने सत्ता स्थापन केली.

शिरोळ तालुक्यातील १४  ग्रामपंचायतींच्या  निवडणुकीत सर्व पक्षांनी स्थानिक गटातटाबरोबर सोयीच्या आघाड्या स्थापन केल्या होत्या.

पण  निकालानंतर स्थानिक पातळीवरील विजयी सरपंच आपलाच असा दावा करीत आपलीच सत्ता यावर नेतेमंडळी ठाम राहिली. मात्र भाजपाने प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत दमदार आगमन केले.  काँग्रेस, राष्ट्रवादी ,स्वाभिमानी पक्षाला काही जागा राखण्यात यश मिळविले आहे तर शिवसेनेला काही सदस्यपदाच्या जागा मिळविता आल्या आहेत.  दरम्यान १४ पकी औरवाड, कनवाड, टाकवडे , खिद्रापूर, शिवनाकवाडी आशा ८ ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले आहे

कागल तालुक्यात अटीतटीच्या झालेल्या २६ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत आमदार हसन मुश्रीफ गटाने सर्वाधिक दहा ठिकाणी सत्ता मिळविली. प्रा. संजय मंडलिक गटाला सात, माजी आमदार संजय घाटगे गटाला चार व समरजितसिंह घाटगे गटाला तीन ग्रामपंचायतीत सत्ता मिळाली. नंद्याळमध्ये अपक्ष उमेदवार राजश्री दयानंद पाटील यांनी सर्वपक्षीय उमेदवाराचा पराभाव केला. तर ठाणेवाडी येथे प्रवीणसिंह पाटील गटाला सत्ता मिळाली. तालुक्यात मुश्रीफ गटाने आपले प्राबल्य या निवडणुकीतही राखले. पाठोपाठ मंडलिक गटाने बाजी मारली. २६ पकी १५ ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra gram panchayat election results 2017 kolhapur district
First published on: 18-10-2017 at 01:58 IST