लोकसत्ता प्रतिनिधी

कोल्हापूर: आधीच वादात सापडलेली पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुन्हा एकदा वादात अडकण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या महिन्यात सांगली येथे ही स्पर्धा होवून प्रतीक्षा बागडी हिने विजेतेपद मिळवले. आज रविवारी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये कुस्तीगीर फाउंडेशन ऑफ महाराष्ट्राच्या अध्यक्षा, सिने अभिनेत्री, शिवसेना नेत्या दिपाली भोसले सय्यद यांनी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोल्हापुरात एप्रिल महिन्यात तीन दिवस रंगणार असल्याचा दावा करताना सांगलीतील स्पर्धा अनधिकृत असल्याचा आरोपही केला आहे.

महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा सातत्याने वादा अडकताना दिसत आहे. कोल्हापूर येथे २० मार्च रोजी पत्रकार परिषदेत दिपाली सय्यद, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी पहिली शासनमान्य महाराष्ट्र केसरी स्पर्धा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात कोल्हापुरात होणार असल्याची माहिती दिली होती.

सांगलीला पहिली गदा

तथापि त्याआधी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी २३ मार्चपासून या स्पर्धा सांगलीत सुरू होणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार स्पर्धा सांगलीत होवून . सांगलीच्या २१ वर्षीय प्रतीक्षा बागडी हिने तिची मैत्रीण स्पर्धक कोल्हापूरची वैष्णवी पाटील हिला चीतपट करून महिला महाराष्ट्र केसरीची पहिली वाहिली गदा पटकावली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोल्हापुरात पुन्हा शड्डू घुमणार

या घटनेला पंधरवडा लोटत नाही तोवर आज पुन्हा पहिल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला नवे वादाचे वळण लागले. दिपाली सय्यद यांनी कोल्हापूर येथे खासबाग मैदानात एप्रिलमध्ये२५ ते २७ एप्रिल असे तीन दिवस ही स्पर्धा रंगणार असल्याचे सांगितले. विविध वजनी गटामध्ये या स्पर्धा होणार आहेत. सांगलीतील स्पर्धा अनधिकृत असल्याचे असल्याचा दावा सय्यद यांनी केला. कोल्हापुरातील स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी आणि बक्षीस वितरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणार असल्याने या स्पर्धेला अधिकृततेची मोहर असल्याचे सय्यद यांचे म्हणणे आहे. यातील विजेत्यांना नोकरीसाठी अधिकृत मानले जाईल, असेही त्या म्हणाल्या. यावेळी राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष योगेश दोडके, संग्राम जरग, अजय चौगुले आदी पदाधिकारी उपस्थित होते.