कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत विरोधात मतदान केलेल्यांनी मोर्चा काढून विचाराला येणे हेच मुळात हास्यास्पद आहे. मोर्चा काढून चुकीचे प्रदर्शन केले गेले आहे. मला बदनाम करण्याचा डाव आहे. मी कुणी लेचापेचा नाही. अशा शब्दात मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज सोमवारी शिवसेनेला इशारा दिला.

यड्रावकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाला विरोध दर्शवित शिवसैनिकांनी यड्रावकर यांच्या कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. तर यड्रावकर समर्थकांनीही शक्तिप्रदर्शन करीत उत्तर दिले. यातून जयसिंगपूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हा वाद पोलिसांनी मिटवला.

विकासासाठी शिंदे सोबत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी समाज माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विरोधकांना हा इशारा दिला. आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, आगामी काळात अपक्ष म्हणूनच माझी भूमिका राहणार आहे. विकासासोबत राहणे गरजेचे वाटत असल्याने शिंदे गटात सामील होण्याचे ठरवले आहे. शिरोळ तालुक्यात कोट्यावधीची विकास कामे झाली आहेत. प्रत्येक गावाला किमान एक कोटीचा निधी मिळाला आहे. इतिहासात इतका विकास निधी पहिल्यांदाच मिळाला आहे. विकासाची ही गती कायम ठेवण्यासाठी शिंदे यांच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे, असेही यड्रावकर यांनी नमूद केले.