कोल्हापूर : वाहनांच्या क्रमांकासाठी देशभर सुरू झालेल्या ‘बीएच’ (भारत) या राष्ट्रीय पातळीवरील मालिकेतील वाहन नोंदणीस गुरुवारी राज्यातही प्रारंभ झाला. या नव्या ‘बीएच’ मालिकेमुळे आंतरराज्य वाहतूक सुलभतेसह अन्य फायदे होणार आहेत. केंद्र शासनाने वाहनांच्या क्रमांकासाठी देशभर एकच ‘बीएच’ अशी नवी मालिका नुकतीच जाहीर केली आहे. प्रत्येक राज्याची स्वतंत्र ओळख असणाऱ्या क्रमांक मालिकेऐवजी आता ‘बीएच’ (भारत) अशी राष्ट्रीय पातळीवरील ओळख देणारी ही योजना आहे. या मालिकेतील महाराष्ट्रातील पहिल्या वाहनाची गुरुवारी नोंद केली गेली.  मुंबई येथे या नव्या ‘बीएच’ मालिकेतील राज्यातील पहिले वाहन रोहित सुते यांना परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या वेळी पाटील म्हणाले, की दिवाळीपूर्वी ‘बीएच’ मालिकेची नोंदणी सुरू करण्याच्या घोषणेची पूर्तता केल्याचे समाधान आहे. दिवाळीमध्ये वाहनधारकांना नोंदणी करताना या निर्णयाने दिलासा मिळणार आहे. याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व व परिवहनमंत्री अनिल परब यांचे सहकार्य मिळाले आहे. परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त राजेंद्र मदने, सुते कुटुंबीय उपस्थित होते.

‘बीएच’ क्रमांकाचे फायदे

‘बीएच’ क्रमांकाची मालिका सुरू होण्याचे वाहनधारकांना बरेच फायदे होणार आहेत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात सहज जाता येईल. मोटार वाहन कायद्यानुसार एका राज्यात नोंदणी केलेले वाहन दुसऱ्या राज्यात बारा महिन्यांपेक्षा अधिक काळ ठेवल्यास नव्याने नोंदणी करावी लागत होती. ही किचकट प्रक्रिया नव्या मालिकेमुळे रद्द झाली आहे. सीमावर्ती राज्य, मालवाहतूक, प्रवासी वाहतूक अशा वाहनधारकांना विना अडवणूक, सुलभपणे परराज्यात प्रवास करता येणार आहे. तसेच वाहन क्रमांक देतानाच त्यात वाहन नोंदणीचे वर्ष असल्याने वाहनाचे आयुष्मान समजणे सहज सोपे होणार आहे. अशा मुदत संपलेली वाहनांवर नियंत्रण आणणे या नव्या मालिकेमुळे सहज शक्य होणार आहे.

‘बीएच’ मालिकेतील पहिले वाहन परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या वेळी सोबत परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त राजेंद्र मदने.