कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रित लढवणार आहे. तथापि सहकारी संस्थांच्या निवडणुका सर्वांना सोबत घेऊन लढल्या जातील, असे विधान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीमध्ये अनेक माजी आमदार येण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांचा लवकरच प्रवेश होईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सहकारी साखर कारखान्यांचा तोटा वाढत असल्याने कारखानदारीबाबत जिल्हा बँकेकडून श्वेतपत्रिका काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील उसाचे उत्पादन सरासरी एकरी २३ टन इतके कमी झाल्याने गळीत हंगाम कमी झाला आहे. दुसरीकडे एफआरपी दरवर्षी वाढत आहे. साखरेच्या दरात त्या मानाने वाढ होत नाही.
चार्जिंगवरील वाहनांची संख्या वाढू लागली आहे. सौरऊर्जेचा प्रभाव वाढत आहे. यामुळे इथेनॉल निर्मिती, सहवीज निर्मिती हे फार काळ चालणार नाहीत, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. आत्तापर्यंत आम्हाला आडून भेटावे लागत होते. संजय घाटगे यांचा भाजप प्रवेश झाला असल्याने उघडपणे भेटू शकतो, अशी टीप्पणी त्यांनी केली.