कोल्हापूर : शहर, जिल्ह्यातील अनेक सहकारी पक्ष सोडून गेले. गोकुळ दूध संघामध्ये देखील सोबत आलेल्यांनी साथ सोडली. या साऱ्यामुळे मी एकटा पडलो आहे, पण जनतेच्या पाठबळावर वाटचाल करणार आहे, असे विधान आमदार सतेज पाटील यांनी गडहिंग्लज येथे बोलताना व्यक्त केले. याचवेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य आणि गोकुळच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार आहे. त्याला आपले सहकार्य हवे, असे आवाहन पाटील यांनी केले.

गोकुळ संचालिका अंजना रेडेकर यांच्या निवासस्थानी नव्याने नोंदणी झालेल्या गोकुळकडील दूध संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते. गोकुळ दूध संघात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील या प्रमुखांची सत्ता आहे. अध्यक्ष निवडीत मोठ्या राजकीय हालचाली होवून आमदार पाटील यांना शह दिल्याचे पहावयास मिळते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अनुषंगाने आमदार पाटील यांनी गडहिंग्लज दौऱ्यात भाष्य केले. ते म्हणाले, गेले २०- २५ वर्षे मी जिल्ह्याच्या राजकारणात आहे. प्रत्येक पंचवार्षिकमध्ये वेगळे गणित असते. काही वेळाला आम्ही एकत्र असतो. तर काही वेळेला एकटा असतो. आताही मी एकटा आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीबरोबर साऱ्यांनी रहावे. जनता दल यामध्ये सहभागी असणार, असे त्यांनी सांगितले. . दिग्विजय कुराडे, अनिरुद्ध रेडेकर, अमर चव्हाण, विद्याधर गुरबे आदी उपस्थित होते.