कोल्हापूर : सकल मराठा समाजाने नेत्यांना गावबंदी आंदोलन सुरू केले असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणालाही सुगावा न देता कोल्हापुरात यावे लागले. कनेरी मठ येथील एका खाजगी कार्यक्रमाला ते अत्यंत सावधरित्या उपस्थित झाले. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सकल मराठा समाजाच्या आंदोलकांना राजाराम पोलीस ठाणे येथे आणून बसवले आहे. मुख्यमंत्र्यांनी आमची फसवणूक केली, असा आरोप आंदोलकांनी केला आहे.

हेही वाचा >>> भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कल्याणमध्ये मराठा कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे

सकल मराठा समाजाने नेत्यांना गावबंदी केली आहे. काल कोल्हापूर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना कोल्हापूर रेल्वे स्टेशन तसेच गारगोटी येथे अडवण्यात आले होते. या आंदोलनाचा धसका मुख्यमंत्र्यांनीही घेतल्याचे दिसून आले.

आज रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणालाही खबरबात नेता कोल्हापुरात आले. अत्यंत सावध यंत्रणा ठेवत ते कनेरी मठ येथे गेले. तेथे एका विभागाचे उद्घाटन त्यांनी केले. मठाच्या परिसरात अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्त  होता.

याचवेळी कोल्हापुरात सकल मराठा समाजाची बैठक सुरू होती. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन राजाराम पोलीस ठाण्यात आणून बसवले. आम्ही मुख्यमंत्र्यांशी सकल मराठा समाजाच्या मागण्या संदर्भात चर्चा केली असती. पण आम्हाला जबरदस्तीने ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री यांनी आमची फसवणूक केलीआहे , असा आरोप आंदोलकांनी केला.