कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी नविद हसन मुश्रीफ यांची निवड झाल्याने सहकारातील राजकारणातही राज्यातील सत्ताधाऱ्यांचा प्रभाव दिसून आला. या निमित्ताने राज्यातील सर्वांत मोठा दूध संघ असलेल्या गोकुळचे नेतृत्व कोणी करावे याचा निर्णय महायुतीचे शीर्षस्थ नेत्यांकडून ठरवला जाऊ लागल्याचे स्पष्ट झाले. गोकुळचे नेते सतेज पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न राजकीय पातळीवर झाला. अध्यक्षपदाचे पत्र सतेज पाटील यांनी देऊन मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी असलेले मैत्र कायम राखत वर्षभरात होणाऱ्या निवडणुकीची पायाभरणी केली.

गोकुळ दूध संघाच्या राजकारण हे पक्ष विरहित होत आले आहे. यामध्ये गेल्या दोन निवडणुकांमध्ये आघाड्यांचे राजकारण घडले होते. दोन्ही आघाड्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या स्थानिक नेत्यांचा सहभाग असल्याचे संमिश्र स्वरूप होते. परंतु यावेळच्या अध्यक्षपदाला राजकीय किनार लागली. त्यातही महायुतीचा अध्यक्ष झाला पाहिजे असा पवित्रा गोकुळचे नेतृत्व हरवलेल्याची बोचणी लागलेल्या महाडिक कुटुंबीयांकडून झाला. खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गळ घालून गोकुळच्या अध्यक्षपद महायुतीकडे आले पाहिजे असा आग्रह धरला. परिणामी गोकुळच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असणारे आनंदराव पाटील चुयेकर यांचे सुपुत्र, सतेज पाटील समर्थक संचालक शशिकांत पाटील यांना बलिष्ठ राजकीय ताकदीपुढे अध्यक्षपदावर विरजण सोडण्याची वेळ आली. युरोपात मोटार स्पर्धा पाहायला गेलेल्या नविद मुश्रीफ यांना गोकुळच्या अध्यक्षपदाची माळ गळ्यात घालून घेण्यासाठी परतावे लागले.

सगळेच मानकरी

या माध्यमातून गोकुळचे नेतृत्व करणारे सतेज पाटील यांची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. सरते शेवटी गोकुळमध्ये तडजोडीच्या राजकारणाचा भाग म्हणून त्यांना ३९ वर्षीय नविद मुश्रीफ हे अध्यक्ष होणार असल्याचे पत्र देणे भाग पडले. यातूनच गोकुळमधील शह – काटशहाचे राजकारण पुढे आले. तरीही गोकुळमध्ये म्हटले तर सर्वांचाच विजय दर्शवणारी राजकीय दृष्ट्या ‘ विन – विन ‘ अशी विचित्र स्थिती पाहायला मिळाली. एका बाजूला महायुतीचा अध्यक्ष झाल्याने भाजपच्या नेतृत्वाला आनंद झाल्याचे समाज माध्यमातून दिसून आले. दुसरीकडे, गोकुळच्या अध्यक्ष निवडीत कोणताही राजकीय हस्तक्षेप झालेला नाही. सत्ताधारी आघाडीच्या माध्यमातूनच नविद मुश्रीफ यांची निवड करण्यात आली असल्याचा दावा सतेज पाटील यांनी करून निवड आपल्या मर्जीने झाल्याचे अधोरेखित केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर नव्या वादाला तोंड

आता गोकुळचे नेतृत्व महायुतीकडे असल्याने दैनंदिन कारभारात विरोधात असलेल्या चार संचालकांचा हस्तक्षेप वाढणार हे उघड आहे. या पातळीवर शाहू विकास आघाडी की विरोधकांना सांभाळून घेणारे कामकाज करताना नविद मुश्रीफ यांची कसोटी लागणार आहे. विरोधकांना सत्तेचे नवनीत देण्याची भूमिका अध्यक्ष मुश्रीफ राहिली तर सतेज पाटील यांचा पवित्रा काय राहणार. यावरून नवे राजकीय वाद उद्भवण्याची चिन्हे दिसत आहेत.