कोल्हापूर : भगवान महावीर अध्यासनाच्या इमारतीसाठी शासन स्तरावरून सर्वोतोपरी सहकार्य मिळवून देण्याची ग्वाही आरोग्य तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी येथे दिली. शिवाजी विद्यापीठात भगवान महावीर अध्यासनाच्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन मंत्री आबिटकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले, एरव्ही शासन म्हणून आम्ही नेहमी देण्याच्या भूमिकेमध्ये असतो. तथापि, या अध्यासनासाठी अनेक दात्यांच्या हातून देणगी, निधी स्वीकारण्याची दुर्मीळ संधीही लाभली. दातृत्वातून मिळणारा आनंद मोठा असतो.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, भगवान महावीर यांचे संपूर्ण तत्त्वज्ञान हे मानवी मूल्यशिक्षणच आहे. ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. विलास संगवे, अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी या अध्यासनाच्या उभारणीसाठी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे.
प्रास्ताविक अध्यासनाचे समन्वयक डॉ. विजय ककडे यांनी केले. संजय शेटे यांनी अध्यासनासाठी शासनाचा तीन कोटींचा निधी मिळण्यासाठी मंत्री आबिटकर यांनी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली. प्रा. डी.ए. पाटील यांनी अध्यासनाची भूमिका स्पष्ट केली. शुभम पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. याप्रसंगी मान्यवरांनी अध्यासनाला एक कोटी ११ लाखांचा निधी जमा केला. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे उपस्थित होते.