कोल्हापूरच्या आद्य मिसळीचे ९७ व्या वर्षांत पदार्पण

दयानंद लिपारे, कोल्हापूर 

कोल्हापूर म्हटले की खवय्यांना झणझणीत मिसळ हटकून आठवते. तांबडा-पांढरा रस्सा जसा लज्जतदार तसा मिसळीचा तडका जिभेला सुखावणारा. अशा मिसळींमधील आद्य मिसळ म्हणून लौकिक असणारी कोल्हापुरातील कसबा बावडा येथील मिसळ शतकपूर्तीकडे वाटचाल करीत आहे. याच टप्प्यावर म्हणजे ९७ व्या वर्षांत पदार्पण करताना मिसळीची चव तशीच ठेवून त्यांच्या स्वरूपात बदल करण्यात येणार आहे. करवीर हे संस्थान असल्यापासून सर्वात पहिली व सुप्रसिद्ध मिसळ अशी ख्याती पावलेल्या मिसळीचा ‘ब्रॅन्ड ’ व्हावा हा यामागील प्रयत्न. यासाठी एक खास ‘लोगो’ तयार करण्यात आला आहे. या लोगोचे अनावरण नव वर्षांच्या पहिल्याच दिवशी करण्यात येणार आहे.

शाहू महाराजांच्या काळातील सर्वात जुनी मिसळ म्हणून ख्याती असणाऱ्या बावडा मिसळीच्या उपाहारगृहाची स्थापना १९२३ साली कोल्हापुरातील कसबा बावडा येथे शंकरराव चव्हाण यांनी केली. त्यांच्या पत्नी चिंगुबाई चव्हाण या राजर्षी शाहू महाराजांच्या मुदपाकखान्यात गोड ‘खांडवे’ हा खाद्यपदार्थ बनवण्यासाठी जात होत्या. त्यांचे  हे गोड खांडवे संपूर्ण पंचक्रोशीत खूपच प्रसिद्ध होते.

शंकरराव चव्हाण हे शाहू महाराजांच्या दरबारी दिवाणजीचे काम करायचे. शंकरराव आणि चिंगुबाई यांचे लग्नही शाहू महाराजांनीच लावून दिले होते. मिसळ हा खाद्यप्रकार मुळात बावडा मिसळीने जन्माला घातला असे म्हणता येईल. तिथून सुरू झालेला प्रवास शंकरराव चव्हाण यांच्या नंतर दिनकरराव चव्हाण, दत्तात्रय चव्हाण आणि आता रत्नदीप चव्हाण आणि त्यांच्या मातोश्री रेखा चव्हाण अशी तब्बल चार पिढय़ांची परंपरा या बावडा मिसळीला लाभलेली आहे.

६० घटक, २५ मसाले

एका छोटेखानी हॉटेलमध्ये सुरू केलेल्या मिसळीची चव आजही तशीच ठेवण्याचा व ती जपण्याचा प्रयत्न चव्हाण कुटुंबीयांनी केला आहे. या मिसळीमध्ये एकूण ६० घटक वापरले जातात. तर २५ प्रकारचे दर्जेदार कोल्हापुरी मसाले या मिसळीला आणखी लज्जतदार बनवतात. मिसळीसाठी लागणारा शेव, चिवडा आणि मसाले हे चव्हाण कुटुंबीय स्वत: बनवतात. येथे काम करणारा पन्नास वर्षांपासूनचा कर्मचारी वर्ग येणाऱ्या खवय्यांचे तितकेच आपुलकीने आदरातिथ्य आजही करत आहे. अशा या कोल्हापुरी झणझणीत मिसळीचा प्रवास पुढे उत्तरोत्तर वाढत तर गेलाच पण त्याने कोल्हापूरच्या खाद्य संस्कृतीला स्वतंत्र ओळख करून दिली.

राजेरजवाडे, वलयांकितांना आकर्षण

ब्रिटिशकालीन राजे-महाराजे यांनीही बावडा मिसळ चाखली आहे. तसेच आपल्या देशाचे डॉलर कॉइन, नोटा बक्षीस म्हणून ते देऊन गेले आहेत. राज कपूर, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, हेमा मालिनी, आर. के. लक्ष्मण, नाना पाटेकर, माधुरी दीक्षित, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे अशा ख्यातनाम व्यक्तींनी येथील मिसळीचा आस्वाद घेतला आहे. बावडा मिसळीला १६ विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, अशी माहिती रत्नदीप चव्हाण यांनी शुक्रवारी दिली.