|दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : आधी भारत भालके, मग सदाभाऊ खोत आणि आता देवेंद्र भुयार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून आमदार झालेल्या तिघांचीही संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. राजू शेट्टी यांच्या समवेत राजकारणाच्या शेत शिवाराची मशागत करणारे सारेच आमदार दुरावले गेले आहेत. यामुळे स्वाभिमानी पुन्हा कोणत्याही आमदार-खासदार विना राहिली असून अशा परिस्थितीत वाटचाल करण्याचे आव्हान ठाकले आहे.

 शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेट्टी यांनी शेतकरी संघटनेचे काम केले. पुढे शेट्टी यांनी स्वत:ची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. शेट्टी यांनी पहिली लोकसभा निवडणूक रिडालोस आघाडीतून लढवली. तेव्हा त्यांनी पंढरपूरमधून भारत भालके यांना उमेदवारी देत निवडून आणले. भालके यांचा सुशीलकुमार शिंदे यांच्याशी संपर्क वाढला. ते कॉंग्रेसचे सहयोगी सदस्य बनले. स्वाभिमानीने त्यांची हकालपट्टी करून पहिला आमदार दूरवर ठेवला.

२००४ पासून शेट्टी यांना सदाभाऊ खोत यांची भक्कम साथ मिळाली. शेट्टी यांनी आपल्या बरोबरीने संघटनेचे अन्य सदस्यही विधिमंडळ, संसदेत पोहोचावे असा प्रयत्न ठेवला. खोत हे माढा लोकसभा मतदारसंघातून लढले. शेट्टी यांनी खोत यांना विधान परिषदेवर संधी दिली. पण तेथे ते जून २०१६ मध्ये भाजपकडून निवडून गेले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक झाल्याने कृषी, पणन राज्यमंत्री म्हणून खोत मंत्रिमंडळात आले. मात्र शेट्टी यांच्याशी मतभेद झाल्याने दोघातील अंतर वाढले. खोत यांच्या संघटनेच्या निष्ठेवर संशय व्यक्त करण्यात येऊन दशरथ सावंत यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीने त्यांची २०१७ मध्ये  हकालपट्टी केल्याने स्वाभिमानीचा आणखी आमदार बाजूला गेला.

 विदर्भातही तेच

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी मतदार संघातील जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र भुयार यांना स्वाभिमानीने उमेदवारी दिली. भाजपचे शेतकरी नेते अनिल बोंडे यांच्यासारख्या प्रभावी प्रतिस्पध्र्याचा पराभव केल्याने भुयार चर्चेत राहिले. पुढे शेट्टी – भुयार यांच्यातील अंतर आणि मतभेद निर्माण झाले. यातूनच शेट्टी यांनी भुयार यांच्या मतदारसंघात जावून हकालपट्टी केल्याची घोषणा केली आहे. स्वाभिमानीला तिसराही आमदार गमवावा लागला आहे. आता या संघटनेत ना आमदार आहे ना खासदार, अशी स्थिती आहे.

  स्वाभिमानी शेतकरी संघटना ही मुळातच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे. या तत्त्वाला तिलांजली देत स्वार्थाचे राजकारण कोणी करत असेल तर त्यांना संघटनेतून बाजूला सारले जाते. त्याप्रमाणे आजवर तिघांना बाजूला केले आहे. आमदार, खासदार, मंत्री असे कोणी नसले तरी स्वाभिमानीचे काम थांबणारे नाही.

– राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार म्हणून लोकप्रतिनिधीस मतदारसंघाचा विकास करायचा असतो. त्यादृष्टीने सत्ताधाऱ्यांशी संपर्क ठेवून मतदार संघाचा विकास करण्यात काही गैर नाही. काहीतरी कारण काढून चळवळीतील कार्यकर्त्यांना दूर करणे सयुक्तिक नाही. कार्यकर्त्यांच्या खांद्यावर चळवळ उभे राहते याचा कोणालाही विसर पडता कामा नये.अविश्वास व्यक्त केला तर कार्यकर्ता लढण्यास कसा तयार होईल.  –  सदाभाऊ खोत