कोल्हापूर : राजकारणातील घराणेशाहीचा मुद्दा अधून मधून डोके वर करत असतो. आताही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीवरून काँग्रेसवर निशाणा साधल्यानंतर तो पुन्हा ढवळून निघाला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या बाबतीत घराणेशाहीने सर्वच प्रमुख पक्षांना घेरले आहे. जिल्ह्यातील सर्वपक्षीय आघाडीच्या नेत्यांमध्ये परिवारवाद वाढत चालला आहे. अन्य पक्षातून अनेकांनी प्रवेश केला असल्याने भाजपातच सर्वाधिक घराणेशाही दिसत आहे. पाठोपाठ स्थान आहे ते घराणेशाहीवरुन टीका होणाऱ्या काँग्रेस पक्षात.
नाशिक येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीची देशाचे मोठे नुकसान केले असल्याने ती संपवा, अशी टीका काँग्रेसला उद्देशून केली होती. कोल्हापूरच्या बाबतीत घराणेशाहीचे जाळे सर्वाधिक भाजपात असल्याचे दिसते. जिल्ह्यातील भाजपचे सूत्रे सध्या खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे आहेत. या कुटुंबात ज्येष्ठ माजी आमदार महादेवराव महाडिक ,त्यांचे पुत्र ताराराणी आघाडीचे अध्यक्ष स्वरूप महाडिक, दुसरे पुत्र माजी आमदार अमल महाडिक, त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, भाचे सत्यजित कदम असा मोठा पट दिसतो. भाजप ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या मागेही राजे विक्रमसिंह घाटगे यांची राजपरंपरा आहे. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांचे वडील बजरंग देसाई हे काँग्रेसचे माजी आमदार होते. दुसरे अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांचे वडील जिल्हाध्यक्ष यांचे वडील विठ्ठलराव नाईक निंबाळकर जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते.
हेही वाचा >>>सुनावणीत विलंबासाठी शिंदे गटाची कायदेशीर खेळी ?
जिल्ह्यातील दोन्ही आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांच्या मागे वारणा समूहाचे संस्थापक तात्यासाहेब कोरे यांचा वारसा आहे. काँग्रेसचा त्याग करून ताराराणी आघाडीकडून निवडून आलेले अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी त्यांचे वडील माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा वारसा पुढे सुरू ठेवला. पत्नी इचलकरंजी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे, त्यांचे पुत्र आवाडे जनता बँकेचे अध्यक्ष स्वप्निल आवाडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे अशी नामावली दिसते आहे.
काँग्रेस पक्षाला नेहमीच घराणेशाहीच्या टीकेला तोंड द्यावे लागते. कोल्हापुरातील परिस्थिती पाहता त्याचे वास्तव लक्षात यावे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील हे त्यांचे वडील माजी आमदार डॉ. डी. वाय. पाटील यांचे वारसदार आहेत. त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील आमदार असून बंधू डॉ. संजय पाटील यांचाही अधून मधून राजकीय संदर्भ जोडला जातो. जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांचा मुलगा राजेश पाटील तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील राजकारणात सक्रिय आहेत. काँग्रेसचे माजी खासदार जयवंतराव आवळे यांचे पुत्र राजू आवळे हे आमदार आहेत. शिरोळ तालुक्यात काँग्रेसचे दिवंगत आमदार सा. रे. पाटील यांचा वारसा दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्याकडे आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाकरे यांच्या घराणेशाहीवर टीका करताना दिसत असतात. पण त्यांच्याच पक्षाचे कोल्हापुरातील प्रमुख परिवारवादाशी जोडल्याचे दिसतात. खासदार संजय मंडलिक यांच्याकडे त्यांचे वडील दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांचा वारसा असून त्यांची मुलेही राजकारणात पाय रोवत आहेत. आजोबा बाळासाहेब माने आणि आई निवेदिता माने यांच्या खासदारकीची परंपरा खासदार धैर्यशील माने चालवत आहेत. त्यांनी आपल्या पत्नीलाही जिल्हा परिषद निवडणुकीत उतरवले होते. शिंदे सेनेला पाठिंबा असलेले शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे त्यांचे वडील शामराव पाटील यांची परंपरा असून त्यांच्या पत्नी स्वरूपा, बंधू संजय पाटील हे जयसिंगपूरचे नगराध्यक्ष होते.
दुसरीकडे ठाकरे सेनेतही घराणेशाही दिसतेच. कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार म्हणून चर्चेत असलेले माजी आमदार संजयसिंह घाटगे यांचा वारसा त्यांचे पत्र जिल्हा परिषदेचे माजी सभापती अमरीश घाटगे चालवत आहेत. शाहूवाडीचे माजी आमदार बाबासाहेब पाटील सरूडकर यांचा वारसा त्यांचे पुत्र माजी आमदार सत्यजित पाटील यांच्याकडे आला आहे.
राजघराण्यात तर परंपरेने वारसा गृहीत धरला जातो. कोल्हापूरचे छत्रपती घराणे राजकारण – घराणेशाहीपासून अलिप्त नाही. श्रीमंत शाहू महाराज यांचे नाव लोकसभेचे उमेदवारम्हणून पुढे येत आहे. संभाजीराजे यांचा भाजपच्या माध्यमातून संसदेत तर मालोजीराजे यांचा काँग्रेसकडून विधानसभेत प्रवेश झाला आहे. आता मालोजीराजे व त्यांच्या पत्नी मधुरिमाराजे यांच्याकडे विधानसभेचे उमेदवार म्हणून पहिले जाते.
मिलिंद देवरा यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशास काँग्रेसची घराणेशाही कारणीभूत ठरली आहे, असा निष्कर्ष नोंदवत अजित पवार गटाचे नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी टीका केली होती. पण त्यांच्याही पक्षांत आणि कुटुंबातही घराणेशाहीचा वारसा आहे. त्यांचे सुपुत्र सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे अध्यक्ष नावेद मुश्रीफ राजकारणात सक्रिय असतात. चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्याकडे त्यांचे वडील माजी आमदार नरसिंग पाटील यांच्याकडून वारसा आला आहे. माजी आमदार के. पी. पाटील व त्यांचे पुत्र रणजीत पाटील हे दोघेही राजकारणात क्रियाशील आहेत.
माजी आमदार राजीव आवळे यांच्याकडे वडील किसन आवळे यांचा वारसा आला आहे. त्यांचे बंधू अब्राहम हे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचे जावई आहेत. घराणेशाहीवर कितीही टीका होत असली तरी कोणताच पक्ष घराणेशाहीपासून लपून राहिलेला दिसत नाही. अगदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्याबरोबरीने पुत्र सौरभ शेट्टी युवा शाखेच्या माध्यमातून पुढे येत आहेत. तर, शेकापचे माजी आमदार संपतराव पवार पाटील यांचे पुत्र क्रांतिसिंह पवार हेही राजकीय चळवळीत सतत दिसत असतात.