नोव्हेंबर महिन्याचा पगार मिळावा या मागणीसाठी इचलकरंजीतील पालिकेतील संतप्त कर्मचा-यांनी सोमवारी काम बंद आंदोलन केले. यावेळी वेळेवर पगार न देणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. मुख्य प्रवेशद्वार बंद करून कर्मचा-यांनी निदर्शने सुरू ठेवल्याने पालिकेत कामासाठी आलेल्या नागरिकांचा चांगलाच खोळंबा झाला. नगराध्यक्षा आणि मुख्याधिका-यांनी जिल्हाधिका-यांकडून पगार देण्यास मंजुरी मिळाल्यावर त्वरित पगार देण्याची कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मात्र कामगारांनी खात्यावर पगार जमा होईपर्यंत काम बंद करण्याचा इशारा दिला. या आंदोलनामुळे पालिकेत दिवसभर शुकशुकाट होता.
इचलकरंजी नगरपालिकेतील कर्मचा-यांना नोव्हेंबर महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नाही. अलीकडे प्रत्येक महिन्याला पगारासाठी मुख्याधिका-यांकडे पाठपुरावा करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचा-यांनी पगाराच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन करत मुख्यप्रवेशद्वारातच ठिय्या आंदोलन सुरू केले. प्रवेशद्वार बंद करून कामगार लोकप्रतिनिधी, नागरिकांना पालिकेत जाण्यापासून रोखले.
सुमारे अर्धा तासाच्या आंदोलनानंतर नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे आणि मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांनी शासनाकडून पगारासाठी निधी आला असला तरी जिल्हाधिका-यांकडून त्याला मंजुरी मिळाली नाही, असे सांगून मंजुरीनंतर त्वरित पगार देण्याची कार्यवाही करू असे आश्वासन दिले. मात्र कामगार नेत्यांनी प्रत्येक महिन्याला ही अडचण उद्भवत असून कायमस्वरूपी १ तारखेला पगार होण्याची व्यवस्था करावी तसेच नोव्हेंबरचा पगार खात्यावर जमा होईपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहील, असा इशारा दिला. नगराध्यक्षा, मुख्याधिकारी यांच्यासमोर पुन्हा पुन्हा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात कामगार नेते शंकर अगसर, हरी माळी, संभाजी काटकर, अण्णासाहेब कागले, ए.बी. पाटील, सुभाष मोरे यांच्यासह पालिकेतील दीड हजाराहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते.