कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा मुश्रीफ

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची पुन्हा निवड झाली.

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ यांची निवड झाल्यावर पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सत्कार केला.

राजू आवळे उपाध्यक्ष

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची पुन्हा निवड झाली. उपाध्यक्षपदी आमदार राजू आवळे यांची निवड झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने अध्यक्षपद पुन्हा मिळवले तर उपाध्यक्षपद कॉंग्रेसने पदरात पाडून घेतले. उपाध्यक्षपदाचा दावा करणाऱ्या शिवसेनेला तूर्तास निराश व्हावे लागले. नूतन संचालकांच्या विशेष बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागीय सहनिबंधक अरुण काकडे उपस्थित होते.

निवडीनंतर सर्वच संचालकांनी मुश्रीफ यांच्या साडेसहा वर्षांच्या कारकीर्दीतील प्रगतीचा उल्लेख करून त्यांच्याहती धुरा सोपवल्याने बँकेचे भवितव्य उज्ज्वल असल्याचा निर्वाळा दिला. पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही बँक जिल्ह्याची आर्थिक वाहिनी असल्याने ती सुस्थितीत राहण्यासाठी सर्वाना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व मुश्रीफ यांच्या माध्यमातून बँकेला मिळाले असल्याने विजयी घोडदौड चालू राहील, असा विश्वास व्यक्त केला. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शेतकऱ्याच्या मुलाला उद्योजक करण्यासाठी अर्थसाहाय्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. खासदार संजय मंडलिक यांनी बँकेची निवडणुकीत विरोधासाठी विरोधाचा हेतू नसल्याने कामकाजावर काही बोललो नाही. बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या जिवावर नव्हे तर स्वबळावर निवडून आलो आहोत, असा चिमटा काढला. आमदार विनय कोरे बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा वाढली असल्याने ग्राहकांना नावीन्यपूर्ण, जास्तीत जास्त सेवा देण्याचे आव्हान पेलावे लागेल, असे नमूद केले. आमदार पी. एन. पाटील, निवेदिता माने यांनीही शुभेच्छा दिल्या.

जबाबदारीचे भान

अध्यक्ष मुश्रीफ यांनी, बँकेत पारदर्शक, चांगला कारभार केला जाईल. ही बँक देशातील प्रथम क्रमांकाची बँक होण्यासाठी गटातटाचे राजकारण न करता एकदिलाने कामकाज केले जाईल, अशी ग्वाही दिली. आमदार आवळे यांनी पूर्णवेळ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत राहू, असे सांगितले.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mushrif re elected chairman kolhapur district bank ysh

Next Story
पंचगंगेत हजारो मासे पाण्यावर…; वाढते प्रदूषण
फोटो गॅलरी