काँग्रेसच्या सोलापूर शहर व जिल्हा ग्रामीण या दोन्ही शाखांचे अध्यक्ष बदलण्याच्या हालचाली पक्षश्रेष्ठींकडून गेल्या तीन महिन्यांपासून होत आहेत. परंतु शहरात नवीन अध्यक्षांचा तिढा अद्यापि सुटला नाही, तर जिल्हा ग्रामीण शाखेच्या अध्यक्षपदासाठी नव्या सक्षम व पात्र नेतृत्वाचा शोध लागत नाही.
डॉ. कृ. भी. अंत्रोळीकर, भाई छन्नुसिंग चंदेले, संभाजीराव गरड, औदुंबर पाटील, माजी मंत्री दीनानाथ कमळे गुरूजींपासून ते माजी आमदार धनाजी साठे यांच्यापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद सांभाळले होते. विद्यमान जिल्हाध्यक्ष संतोष पाटलांनी गेल्या वर्षी अचानकपणे जिल्हाध्यक्षपदासाठी स्वत:ची वर्णी लावून घेतली. परंतु राजकारणात पदार्पण करण्यापूर्वीची त्यांची पाश्र्वभूमी व राजकारणात प्रवेश केल्यानंतरची त्यांची कार्यपध्दती हा पक्षांतर्गत वादाचा विषय ठरला आहे. त्यामुळे नवा जिल्हाध्यक्ष निवडावा, अशी मागणी सुरूवातीपासून जोर धरत आहे. त्याची दखल घेत प्रदेश पक्षश्रेष्ठींनीही नवा अध्यक्ष निवडीचे संकेत दिले आहेत.
दुसरीकडे पक्षाचे शहराध्यक्षपद माजी आमदार प्रकाश यलगुलवार हे प्रभारी म्हणून गेल्या तीन वर्षांपासून सांभाळत आहेत. त्यांनी अलीकडेच या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केल्यामुळे पक्षश्रेष्ठींनी शहराध्यक्षपदासाठीही चाचपणी केली आहे. यात पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे खंदे समर्थक सुधीर खरटमल व प्रा. अजय दासरी हे प्रबळ दावेदार समजले जातात. मात्र त्याचवेळी जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांची चाचपणी घेतली असता त्यात कोणीही सक्षम व पात्र कार्यकर्ता पुढे येत नसल्याचे सांगितले जाते. शहर व जिल्ह्य़ात काँग्रेसचे तीन आमदार आहेत. यापैकी अक्कलकोटचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांना गळ घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी जिल्हाध्यक्षपद सांभाळण्यास नकार दिल्याचे समजते. पंढरपूरचे आमदार भारत भालके, माजी आमदार दिलीप माने व वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे हेदेखील जिल्हाध्यक्षपद सांभाळावयास राजी नाहीत. त्यामुळे माळशिरसचे के. के. पाटील यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ पडणार का, अशी शक्यता राजकीय गोटात वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही योग्य जिल्हाध्यक्षपदासाठी योग्य व्यक्तीचा शोध घेतला जात असल्याचे सूतोवाच केले.
अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेसला आता विरोधी पक्षाची भूमिका सांभाळताना जिल्हाध्यक्षपद सांभाळण्यास बऱ्याच स्थानिक नेत्यांनी नकार दिल्याचे मानले जाते. जर पक्ष सत्तेत असता तर जिल्हाध्यक्षपदासाठी मोठी चढाओढ लागली असती, विरोधी पक्षात असल्यामुळे पक्षाचा गाडा हाकताना आर्थिक अडचणी येतात. त्यातूनच जिल्हाध्यक्षपदाची खुर्ची ‘काटेरी’ वाटू लागल्याचे मानले जाते.
संग्रहित लेख, दिनांक 15th Mar 2016 रोजी प्रकाशित
सोलापुरात काँग्रेस अध्यक्षपदासाठी पात्र उमेदवार मिळेना
काँग्रेसच्या सोलापूर शहर व जिल्हा ग्रामीण या दोन्ही शाखांचे अध्यक्ष बदलण्याच्या हालचाली पक्षश्रेष्ठींकडून गेल्या तीन महिन्यांपासून होत आहेत.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 15-03-2016 at 01:40 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not available eligible candidate in solapur congress