एम.फील, पीएच.डी.साठी मार्गदर्शकांना मान्यता देण्यासाठीची विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) नवी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यूजीसीने गेल्यावर्षी केवळ पदव्युत्तर संस्थांमधील नियमित शिक्षकांनाच मार्गदर्शक म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेतल्याने महाविद्यालय स्तरावरील मार्गदर्शकांची तसेच संशोधक विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली होती. ती या नव्या अधिसूचनेमुळे दूर झाली आहे. या संदर्भात शिवाजी विद्यापीठाने गेले वर्षभर सातत्याने या विषयी यूजीसीकडे पाठपुरावा केला. या मध्ये विद्यापीठाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावाही केला आहे.

यूजीसीने एम.फील, पीएच.डी. पदवी प्रदान करणेबाबत किमान मानदंड व प्रक्रिया विनिमय-२०१६ ही सन २००९ च्या अधिसूचनेला अधिक्रमित करणारी अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पात्रता, मानके आणि प्रक्रियेचे नियम निर्धारित करण्यात आले आहेत. त्यामध्ये एम.फील, पीएच.डी. मार्गदर्शकांच्या पात्रतेचे निकषही स्पष्ट केले आहेत. केवळ संबंधित विद्यापीठ, महाविद्यालय येथील पूर्ण वेळ शिक्षकच मार्गदर्शक म्हणून काम करू शकतील. बाह्य मार्गदर्शकास परवानगी नाही. तथापि, आंतरविद्याशाखीय संशोधनाच्या बाबतीत संशोधन सल्लागार समितीच्या मान्यतेने सह-मार्गदर्शक म्हणून त्याच संस्थेतील अथवा संबंधित संस्थेमधील शिक्षकास मान्यता देण्यास परवानगी देण्यात आली आहे.

संशोधक मार्गदर्शक, सह-मार्गदर्शक हा प्राध्यापक एकाच वेळी जास्तीत जास्त ३ एम.फील. व ८ पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकेल.

सहयोगी प्राध्यापक जास्तीत जास्त दोन एम.फील. व ६ पीएच.डी. संशोधकांना तर सहायक प्राध्यापक हा एक एम.फील. व ४ पीएच.डी. संशोधकांना मार्गदर्शन करू शकेल.

अधिसूचनेची यंदापासूनच अंमलबजावणी

शिवाजी विद्यापीठाने यंदाची एम.फील, पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया यूजीसीच्या निर्णयासाठी स्थगित ठेवली होती. यूजीसीचा प्रतिसाद मिळविण्यासाठी सातत्याने संपर्क साधून पाठपुरावा करण्यात येत होता. आता प्राप्त अधिसूचनेबाबत बोर्ड ऑफ युनिव्हर्सटिी टीचिंग रिसर्च तसेच अन्य अधिकार मंडळांची मान्यता घेऊन या वर्षीपासूनच (सन २०१६-१७) अमलात आणण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले