कोल्हापूरमध्ये पर्यटनवाढीला संधी ; जिल्ह्य़ात ३० स्थळे निश्चित करून लवकरच आराखडा

कोल्हापूरच्या पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी नव्याने पावले टाकली जात आहेत.

दयानंद लिपारे, लोकसता 

कोल्हापूर : कोल्हापूरच्या पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी नव्याने पावले टाकली जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी नव्या जोमाने नवनव्या संकल्पना साकारण्याची नियोजन केले आहे. जिल्ह्यातील मंत्र्यांनी पाठबळ देत हा उपक्रम अधिक समृद्ध करण्याचे नियोजन केले आहे. कोल्हापूरच्या पर्यटन वाढीसाठी अनेक प्रयत्न होत असले तरी त्याला अपेक्षित यशाची झळाळी का प्राप्त होत नाही याचेही चिंतन आणि कृती करण्याची आवश्यकता   आहे.

कोल्हापूर जिल्हा सर्वागाने समृद्ध आहे. पश्चिम घाटाच्या निसर्गसंपन्न कुशीत असलेल्या या जिल्ह्याला इतिहासाचा अमूल्य ठेवा आहे. निसर्गाची मुक्त उधळण आहे. गडकोट आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी तो सुजलाम झाला आहे. महालक्ष्मी, जोतिबासारखी धार्मिक स्थळे, राधानगरी पहिले अभयारण्य, वारसा हक्क स्थळे ,कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि खाद्यसंस्कृती असे मन तृप्त करणारे पर्यटन जिल्ह्यात खचाखच भरले आहे.

प्रशासनाचे प्रयत्न

मुंबई, पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्ग तसेच कोकण, गोवा या पर्यटनासाठी समृद्ध असणाऱ्या भागाला जोडणारा दुवा हा जिल्हा आहे. त्यामुळे कोल्हापुरात अर्थचक्राला गती प्राप्त व्हावी, अशी व्यापक भूमिका घेऊन नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जागतिक पर्यटन सप्ताहाचे निमित्त साधून नियोजन केले होते.

त्याला पर्यटकांनी चांगला प्रतिसाद दिला. ‘पर्यटन वाढीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात विपुल संधी आहे. सर्व स्तरावरील पर्यटकांना सामावून घेणारी व्यवस्था कार्यरत आहे. जिल्ह्यात ३० पर्यटन स्थळे निश्चित केली आहेत. तेथे पर्यटनाला चालना मिळण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. केरळच्या धर्तीवर पर्यटनाचे कोल्हापूर प्रारूप उभारण्यात येणार आहे,’ अशी संकल्पना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी डोळय़ासमोर ठेवली आहे.

या संकल्पनेला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पाठबळ दिले आहे. ‘येत्या पाच वर्षांत पर्यटनातून जिल्ह्यात समांतर अर्थव्यवस्था उभी राहावी. ‘डेस्टिनेशन कोल्हापूर’ जागतिक स्तरावर पोहचण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. ब्रँिडग करून पर्यटकांना जिल्ह्यात आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे.

येथील चविष्ट खाद्यसंस्कृती वलयांकित करून ती महाराष्ट्राची ‘फूड कॅपिटल’ झाली पाहिजे’, अशा अपेक्षा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या आहेत. ‘कोल्हापूर जिल्ह्यात ऐतिहासिक, नैसर्गिक, धार्मिक, आधुनिक पर्यटन अशा सर्व बाबी उपलब्ध आहेत.

कोल्हापूर देशात पर्यटनात प्रथम क्रमांकाचा जिल्हा झाला पाहिजे’, असा मनोदय ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे.

उत्सवीकरणावर भर

मंत्र्यांच्या आजवरच्या उपक्रमांना तत्कालीन जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन, पर्यटनाशी संबंधित हॉटेल आदी व्यवसायिकांनी उत्तम साथ दिली आहे. इतके सारे करूनही कोल्हापूरचे पर्यटन एका मर्यादेच्या पुढे झेप घेऊ शकले नाही.  आकर्षक घोषणा करून प्रसिद्धीवर स्वार होण्यापेक्षा प्रामाणिक इच्छाशक्ती, सक्रिय कृती केली तरच कोल्हापूरचे पर्यटन पुढच्या टप्प्यावर जावू शकते.

प्रत्येक पालकमंत्र्यांचा वेगळा उपक्रम

पर्यटकांकडून प्रामुख्याने महालक्ष्मी, ज्योतिबा दर्शन, पन्हाळा अशी सैर केली जाते. काहीजण नरसिंहवाडी, खिद्रापूर,बाहुबली, बाळूमामा येथे दर्शन करतात. काहींना गडकोट आकर्षित करतात. हिरव्यागार वनराईत रमणारे बरेचसे आहेत. तथापि या साचेबद्ध वर्तुळाच्या पल्याड जाऊन कोल्हापुरात काही दिवसांचा मुक्काम करावा असे पर्यटकांच्या मनी ठसवण्यात पर्यटनविषयक प्रयत्न अगदीच कमी पडले आहेत. पुढच्या प्रवासाला निघताना कोल्हापूरवर एक नजर टाकायची. इतका मर्यादित दृष्टिकोन बहुतांशी पर्यटकांमध्ये दिसतो. वास्तविक कोल्हापूरचे पर्यटन वाढण्यासाठी शासन, जिल्हा प्रशासन यांच्या पातळीवरून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. तत्कालीन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुंबई येथे ‘करिश्मॅटिक कोल्हापूर’ या नावाने पर्यटनाचे लॉचिंग केले होते. येथील ऐतिहासिक वास्तू, खाद्य संस्कृती, लोकजीवन, निसर्ग सौंदर्याची माहिती देणारे पुस्तक, सीडी, माहितीपट असा बराचसा मामला त्यात होता. पुढे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘आडवाटेवरचे कोल्हापूर’ ही नावीन्यपूर्ण संकल्पना राबवली. राज्यभरातील पर्यटकांनी या मोफत सहलसेवेचा लाभ घेतला. आता ही  संकल्पना कधीचीच आडवळणावर गेली असून किती पर्यटकांची तिकडे पावले पडतात हा संशोधनाचा भाग आहे. आता पालकमंत्री सतेज पाटील यांनी ‘डेस्टिनेशन कोल्हापूर’ या कल्पनेत रमले आहेत. यातून जिल्ह्याचा पर्यटन फुलताना अर्थकारणालाही गती देण्याचे त्यांचे नियोजन आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कोल्हापूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Opportunity for tourism growth in kolhapur zws

Next Story
अनंत माने जन्मशताब्दी वर्षांस सुरुवात
ताज्या बातम्या