विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

हिवाळी अधिवेशन संपताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, आज कर्जमाफीची सर्वाधिक गरज अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना असताना त्यांना ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे सरकारने अवकाळीग्रस्तांच्या तोंडाला पानं पुसली आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच अवकाळीग्रस्तांच्या कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला. कोल्हापुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले, की राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे ९४ लाख हेक्टरवरचे पीक वाया गेले आहे. त्यामुळे अशा अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांनी घेतलेली कर्जे परत करण्याची त्यांची क्षमताच राहिलेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना कर्जमाफीची सध्या सर्वाधिक गरज होती. मात्र, सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा या लोकांना होणार नाही.

सरकारवर टीका करताना फडणवीस म्हणाले, कर्जमाफीवरून सरकारमधील पक्षांनी केलेलं हे दुसरं घुमजावं आहे. कारण शेतकरी कर्जमाफी, सातबारा कोरा करू अशा घोषणा सत्तेतील तिन्ही पक्षांनी आपल्या जाहिरनाम्यात दिल्या होत्या. हिवाळी अधिवेशनात सरकारने केवळ वेळ मारून नेली आहे.

सरकारची कर्जमाफीची उधारीची घोषणा आहे. आजच्या अडचणीतील शेतकऱ्यांना थेट मदत होणं गरजेचं होतं. त्याचबरोर सर्व प्रकारची मध्यम—दीर्घ मुदतीची सर्व कर्जे माफ केल्यासच सातबारा कोरा होतो. यापूर्वी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा निर्णय आमच्या सरकारनेच घेतला होता. त्यामुळे कोल्हापूरच्या भागात या नव्या कर्जमाफीचा उपयोग होणार नाही. उलट अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांनादेखील या कर्जमाफी योजनेचा फायदा मिळाला पाहिजे. सरकारने आपल्या आश्वासनांची पूर्तता करायला हवी. आम्ही लवकरच रस्त्यावर उतरून अवकाळीग्रस्तांसाठीच्या कर्जमाफीची मागणी सरकारकडे करणार आहोत. हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. मात्र, हे अधिवेशन म्हणजे फक्त औपचारिकता होती. आम्ही ५ तास प्रश्न उपस्थित केले. मात्र, मंत्र्यांनी फक्त ३ मिनिटे बोलून उत्तरे दिली, असेही फडणवीस म्हणाले. दरम्यान या वेळी माजी खासदार धनंजय महाडिक यांचे चुलत बंधू सम्राट महाडिक आणि राहुल महाडिक यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.

आणखी वाचा – मी पाहिलेले उद्धव ठाकरे असे नव्हते – फडणवीस

‘सत्तेसाठी ठाकरे कोणत्याही स्तरावर’

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जात सरकार स्थापन करण्याचा शिवसेनेचा प्रकार गंभीर आहे. असा प्रकार आम्ही कधीही केला नसता. सत्तेसाठी ते कोणत्याही स्तरावर गेले असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. भाजपला सत्तेसाठी कायमचा पाठिंबा देणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणत आहेत. त्यांच्या या विधानावर फडणवीस म्हणाले की, सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा शब्द उद्धव यांनी बाळासाहेबांना दिला होता का, बाळासाहेबांना ते कदापि आवडले नसते. मी पाहिलेले उद्धव ठाकरे असे नव्हते, अशी टीका त्यांनी केली. नागरिकत्व कायद्याचे जोरदार समर्थन करून फडणवीस यांनी विरोधकांना धारेवर धरले. कायदा न्यायपूर्ण असून त्याने राष्ट्रहित साधले जाणार आहे. यामुळे पोटशूळ उठलेले काही पक्ष अफवा पसरवत आहेत. राजकीय हेतूने प्रेरित होऊन विघटन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विदर्भामध्ये ठाकरे स्वत: लक्ष घालणार आहेत, तर पुणे महापालिकेत ५० जागा मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शिवसेनेने भाजपविरोधी आR मक मोहीम उघडली आहे. याकडे लक्ष वेधले असता फडणवीस यांनी केवळ बोलण्यात आक्रमता नको कृती करून दाखवा, असा टोला सेनेला लगावला.