कोल्हापूर : ‘अरे तुमच्यात सामील होऊ द्या की रं, मला बी जत्रंला येऊ द्या की रं ‘… असा लडिवाळ जत्रेला जाण्याचा हट्ट धरणारे गाणे अनेकांच्या मनात रुंजी घालत असेल. जत्रेला जाण्याची मनीषा वेगळ्या प्रकारे घडवून भादवणकरांनी गुरुवारी वेगळेच उड्डाण घेतले. मुंबईतील हे चाकरमानी गावच्या जत्रेच्या ओढीने चक्क मुंबईहून कोल्हापूरला विमानाने आले आहे. त्यांच्या या प्रवासाची कौतुकमिश्रित चर्चा होत आहे.

आजरा तालुक्यातील भादवण या गावची जत्रा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात असते. महालक्ष्मी देवीच्या यात्रेला दरवर्षी राज्यभरातील गावकरी येत असतात. मुंबईत स्थायिक झालेले बांधव सुद्धा हरेक वर्षी यात्रेसाठी एसटी, खासगी बस, स्वतःचे वाहन, रेल्वे जमेल त्या पद्धतीने गावाकडे येऊन जत्रेचा आनंद लुटत असतात.

अशी सुचली संकल्पना

यावर्षी भादवणकरांनी वेगळीच झेप घेतली. त्यांनी मुंबईहून कोल्हापूरला विमानाने यायचे ठरवले. गावातील आर. बी. पाटील हे मुंबईत एअर इंडियात नोकरीला आहेत. त्यांनीच पुढाकार घेत या वर्षी यात्रेला विमानाने जाऊया, अशी कल्पना मांडली. पाठोपाठ एक-दोन करीत अनेकांनी तयारी दर्शवली. अल्पावधीत त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिलीच घटना

आज दुपारी ही सर्व मंडळी मुंबईहून कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. ‘आम्ही भादवणकर’ असा भगवा टी शर्ट, साडी परिधान करून आलेल्या या चमूने विमानतळावर अनेकांचे लक्ष वेधले. जत्रेला तेही विमानाने जाण्याची हौस बाळगणारे भादवणकर हे राज्यातील पहिले गावकरी ठरल्याचा दावा त्यांनी केला. ‘ एरवी, पर्यटन, व्यापार, सहल, लग्न अशा वेगवेगळ्या कारणांनी लोक विमान प्रवास करतात. आम्ही देवीच्या दर्शनाच्या ओढीने हवाई सहल केली,’ असे आर. बी. पाटील यांनी या मागील भावना उलगडत सांगितले.