कोल्हापूर: महालक्ष्मी मंदिरात वस्त्रसंहिता लागू केल्यानंतर लगेचच त्याचा परिणाम दिसून आला. तोकडे कपडे परिधान करून आलेल्या दोघा भाविकांना सोवळे नेसून दर्शन घेण्यास भाग पाडण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत महालक्ष्मी व दख्खनचा राजा जोतिबा या मंदिरात कालपासून वस्त्रसंहिता लागू केली आहे. तोकडे कपडे घालून येणाऱ्या भाविकांना मज्जाव करण्यात आला आहे.
आज दोन पुरुष भाविक तोकडे कपडे परिधान करून मंदिरात आले होते. भाविक रांगेतून जाणाऱ्या त्या भाविकांना हटकण्यात आले. त्यांनी मंदिरात वस्त्रसंहिता लागू झाल्याची कल्पना दिली. त्यानंतर त्यांनी सोवळे नेसले आणि देवीचे दर्शन घेतले. वस्त्रसंहितेचा निर्णय योग्य असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी नोंदवली.
दरम्यान करवीर निवासिनी महालक्ष्मी आणि दख्खनचा राजा जोतिबा या दोन मंदिरांमध्ये मंगळवारी देवस्थान समितीकडून वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. महालक्ष्मी व जोतिबा या दोन्ही मंदिरांतील धार्मिक वातावरण, पावित्र्य आणि परंपरा जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समितीच्या पत्रकात म्हटले आहे. तोकडे कपडे किंवा अशोभनीय पोशाख घालून आलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. मंदिरात येणाऱ्या सर्वांना ही वस्त्रसंहिता लागू असणार आहे. धार्मिक विधी आणि मंदिराच्या शुद्धतेच्या दृष्टिकोनातून भाविकांनी साडी, सलवार-कुर्ता, धोतर, पायजमा-कुर्ता यासारखे कपडे परिधान करावेत. या नियमाचे पालन करून मंदिर प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन समितीने केले आहे.
निर्णयाचे स्वागतमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी येताना तोकडे कपडे न घालता पारंपरिक कपडे परिधान करण्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे ३० मार्च रोजी निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्यानुसार आज घेतलेला निर्णय हा स्तुत्य असून, त्याचे स्वागत करीत असल्याचे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रमोद सावंत, अभिजित पाटील, प्रसाद कुलकर्णी यांनी पत्रकात म्हटले आहे.