ज्येष्ठ नेते गोिवद पानसरे यांच्या खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी शाळकरी मुलाच्या जीविताबद्दलचे पत्र िहदू विधिज्ञ परिषदेकडून येथील राजारामपुरी पोलिसांना प्राप्त झाले असून, याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी मुलाला आजपासून पोलीस संरक्षण पुरवणार असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले. या पत्रातील मजकूर वाचून िहदू विधिज्ञ परिषदेच्या हेतूबद्दल पानसरे कुटुंबीयांनी शंका व्यक्त केली असून, मेधा पानसरे यांनी साक्षीदारावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
पानसरे यांच्या खून प्रकरणातून प्रत्यक्षदर्शीमध्ये एका शाळकरी मुलाचा समावेश आहे. या मुलाच्या संरक्षणावरून िहदू विधिज्ञ परिषदेने पोलिसांना पाठवलेल्या पत्रात काही शंकास्पद मुद्दे उपस्थित केले आहेत. परिषदेचे अ‍ॅड. संजीव पुनाळकर यांनी संस्थेच्या लेटरहेडवर कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांच्या पत्त्यावर १२ डिसेंबर २०१५ रोजी पत्र पाठवले आहे.
पानसरे हत्या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी शाळकरी मुलगा साक्षीदार आहे. मुलाच्या जीविताचे बरेवाईट झाले तर त्याचे खापर ‘सनातन’ संस्थेवर फोडले जाऊ नये यासाठी त्यास पुरेसे पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे, अशी अपेक्षा पुनाळकर यांनी पत्रामध्ये व्यक्त केली आहे.
दरम्यान, मुलाचा दिवसभरातील दिनक्रम पत्रात स्पष्टपणे उल्लेख केल्याने तो कुठे जातो, काय करतो हे आम्हाला चांगले माहीत आहे, असेच या पत्रातून सुचवायचे आहे की काय, अशी भीती पालकांच्या मनातही उद्भवली आहे. प्रत्यक्षदर्शी शाळकरी मुलगा हा हल्ला झाला त्याच्या समोरच असलेल्या सरस्वती चुनेकर विद्यामंदिरात शिकतो. सदर विद्यार्थी एकटाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने या खटल्याचे भवितव्य त्याच्या साक्षीवरच अवलंबून असल्याने त्याच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत मंगळवारी मेधा पानसरे व कॉ. दिलीप पवार यांनी पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांची भेट घेऊन मुलाच्या संरक्षणाची मागणी केली. त्यावर देशपांडे यांनी या प्रकरणाची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली असल्याचे सांगून त्याला संरक्षण पुरवणार आहे. तसेच तपास यंत्रणा, सरकारी अभियोक्ता यांच्याशी चर्चा करून पुढची पावले टाकणार असल्याचेही स्पष्ट केले. यानंतर पत्रकारांशी बोलताना पानसरे यांनी िहदू विधिज्ञ परिषदेच्या पत्रामध्ये मुलाच्या संरक्षणाचा मुद्दा असला तरी त्यांची शब्दयोजना काही वेगळाच अर्थ सुचवते. साक्षीदारावर दडपण आणण्याचा हेतू स्पष्ट दिसत असल्याने मुलाची आम्हाला काळजी वाटते. पानसरे खून प्रकरणी उच्च न्यायालयात खटल्याचे काम सुरू असून ७ जानेवारीला होणाऱ्या सुनावणीवेळी न्यायालयाच्या निदर्शनास हा मुद्दा आमचे वकील अभय नेवगी हे उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.