कोल्हापूर : विद्यमान खासदारांनी मतदारसंघातील कोणत्या प्रश्नावर सभागृहात सरकारला धारेवर धरले हे दाखवावे. विकासकामाबाबत गौडबंगाल असून आमदार, दुस-या पक्षातील पदाधिकारी यांनी केलेल्या कामांचे डिजीटल बोर्ड मतदारसंघात लावले जात आहेत, अशी टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. त्यांनी या मुद्द्यावरून त्यांचे लोकसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्यावर टीकास्त्र सोडले. नरंदे येथे संपर्क दौऱ्यामध्ये राजू शेट्टी यांनी हे मत व्यक्त केले.

हेही वाचा >>> खासदार मंडलिक, माने – विनय कोरे भेटीत निवडणुक रणनीतीची चर्चा

दिल्लीच्या लोकसभेमध्ये गल्लीतील सर्वसामान्य जनतेचे धोरण ठरत असते. यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर बदल्या मध्ये रस न दाखवता व विकासकामात टक्केवारी न घेता लोकप्रतिनिधींनी काम करणे गरजेचे असते. सध्याच्या लोकप्रतिनिधींना सामान्य जनतेचे प्रश्न महत्वाचे नसून स्वहितासाठी जनतेचे प्रश्न खुंटीला टांगले आहेत. यामुळे सर्वसामान्य जनता त्यांना या निवडणुकीत जागा दाखविणार आहे , अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली.

हेही वाचा >>> “पाठिंब्यासाठी दुसऱ्याच्या पायऱ्या का झिजवत आहेत?”, खासदार माने यांची राजू शेट्टी यांच्यावर टीका

ते म्हणाले ,सामान्यांना न्याय मिळण्यासाठी रस्त्यावरची लढाईबरोबर  सभागृहातील लढाई एकत्रितपणे लढल्यास शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळतो. सरकारने कराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामान्य जनतेकडून वसुली करतात. मात्र त्याचा परातावा उद्योजकांचीची कर्जे राईट ॲाफ करण्यासाठी केली जाते ही शोकांतिका आहे. सामान्यापर्यंतच्या योजना फक्त कागदावरच असून त्याची  जाहीरातबाजी करण्यात येत आहे. आज दिवसभरात सावर्डे , कापूरवाडी , मिणचे , लाटवडे , भेंडवडे , खोची , बुवाचे वठार , नरंदे, नेज , हिंगणगांव , कुंभोज या गावात संपर्क दौरा करण्यात आला.