scorecardresearch

शाहू महाराज स्मारक बांधण्याचा पुनरुच्चार 

राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी निमित्त कोल्हापुरात ४०० कोटी खर्चाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बांधण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात केल्याने शाहूप्रेमींच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

दयानंद लिपारे

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी निमित्त कोल्हापुरात ४०० कोटी खर्चाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बांधण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात केल्याने शाहूप्रेमींच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. तथापि जिल्ह्याच्या विकासासाठी यापूर्वी विविध कामांसाठी केलेल्या निधींच्या घोषणा कागदावरच असल्याने या प्रकल्पाच्या बाबतीत त्याची पुनरावृत्ती होणार नाही ना, याबद्दलही नागरिक साशंक आहेत.

राजर्षी शाहू महाराज यांनी सामाजिक सुधारणा घडवताना संस्थानाचा सर्वागीण विकास केला. राधानगरी हे देशातील पहिले धरण बांधून परिसर सुजलाम सुफलाम केला. श्री शाहू छत्रपती मिल्सची उभारणी करून उद्योगाचे पर्व सुरू केले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात शाहू मिलचा अखेरचा भोंगा वाजून २ हजार कुटुंबीयांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा मध्यवर्ती ठिकाणच्या मिलच्या २७ एकर जागेवर अनेक राज्यकर्त्यांचा डोळा होता.

 शाहू मिलची भग्नावस्था कायम

 पुढे ‘ मिल सुरू केली जाणार, ‘ गारमेंट प्रकल्प उभा केला जाणार ‘ अशा अनेक घोषणा केल्या पण त्या शेजारच्या कोटीतीर्थ तलावात बुडाल्या. या जागी  आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. त्यानंतर गेल्या दशकभरात पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अशा मुख्यमंत्र्यांचा कार्यकाल झाला पण शाहू मिलची भग्नावस्था काही दूर झाली नाही.

आता स्मृती शताब्दी वर्षांनिमित्त स्मारकाचा प्रश्न जनतेमध्ये चर्चेत राहिला. तेव्हा घाईघाईने स्मारकाचे नव्याने सादरीकरण केले. पाठोपाठ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशा घोषणा करून दिलासा दिला. मात्र या समारंभात त्यांच्याकडून शाहू जन्मस्थळाचा रखडलेला विकास कधी पूर्ण होणार यावर भाष्य झाले नाही.

मंदिर,पर्यटन,उद्योग

  महालक्ष्मी, जोतिबा, नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर ही प्रमुख देवस्थाने तद्वत कोल्हापूरचे पर्यटनही राज्यभरातील पर्यटकांना साद घालणारे आहे. या साऱ्यांसाठी तत्कालीन सरकारने निधीच्या घोषणा केल्या आहेत. महालक्ष्मी मंदिराचा २००८ सालचा आराखडा बासनात गुंडाळला. तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहा कोटीची घोषणा केली पण निधी अखर्चित राहिल्याने तो शासनाकडे परत पाठवला गेला. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकालात २०१६ मध्ये २५०कोटीचा तीर्थक्षेत्र आराखडय़ास मंजुरी देताना ७२ कोटी रुपये तात्काळ वितरित करण्याचे आदेश झाले. यंदाच्या अर्थसंकल्पा मध्येनिधी देण्याची ठाकरे सरकारने घोषणा केली आहे. १५५ कोटीचा श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी परिसर विकास आराखडा निधीच्या प्रतीक्षेत आहे. यंदा अर्थसंकल्पात कोल्हापूर जिल्ह्यासाठी पर्यटन विभागाकडून ३१ कोटी मंजूर केले असले तरी निधी कधी येणार याची प्रतीक्षा अभ्यासकांमध्ये आहे.

निधीचे काय?

शाहू मिलमध्ये स्मारक साकारण्यासाठी निधी देण्याच्या घोषणा यापूर्वी कोल्हापुरात पाऊल टाकल्यानंतर प्रत्येक मुख्यमंत्री, वस्त्रोद्योगमंत्री यांनी केल्या आहेत. त्या त्या वेळचे पालकमंत्रीही असेच भाष्य करीत राहिले. आता थेट ४०० कोटी रुपयांचा प्रकल्प आकाराला येणार असून त्यामध्ये कला-क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्राचा विकास होण्यासह वस्त्रोद्योगासाठी विशेष कक्ष असणार आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी निधी उपलब्ध होण्याबाबत कुचाळक्या करू नयेत, असा उपरोधिक टोला लगावला. शाहू स्मारकाचे काम गतीने पुढे नेण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध असले तरी कोल्हापूरच्या विकासाची धोरणे आणि पावले याबाबत राजमार्गाची वाटचाल कूर्मगतीची असल्याचा इतिहास असल्याने राज्य शासन आपल्या शब्दाला जागणारा का? असा प्रश्न पडावा अशीच परिस्थिती आहे. घोषणा मागून घोषणा झाल्या आहेत पण निधीच्या उपलब्धतेचे काय हाच कळीचा मुद्दा आहे.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Reiteration construction shahu maharaj memorial international standard monument memorial day ysh

ताज्या बातम्या