ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी सारंग दिलीप अकोलकर आणि विनय बाबूराव पवार यांना पकडून देणाऱ्यांना १० लाख रुपयांचे बक्षीस बुधवारी येथे जाहीर करण्यात आले.

संशयित आरोपी अकोलकर हा पुण्याचा असून, पवार हा कराडजवळील उंब्रजचा रहिवासी आहे. यापूर्वी पानसरे हत्येप्रकरणी समीर गायकवाड आणि सनातन संस्थेचा साधक डॉ. वीरेंद्र तावडे यांना अटक झाली होती. तपासामध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे पवार व अकोलकर यांची नावे पुढे आली. परंतु त्यांचा शोध लावण्यात पोलिसांना अद्याप यश आले नव्हते. त्यामुळे सरकारने बुधवारी त्यांची माहिती देणाऱ्यास हे १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.

पानसरे यांच्यावर फेब्रुवारी २०१५ मध्ये हल्ला झाला होता. या प्रकरणी सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड आणि वीरेंद्र तावडे यांच्यासह विनय पवार आणि सारंग अकोलकर यांच्यावर विशेष तपास यंत्रणेने दोषारोप दाखल केले आहेत. यापकी वीरेंद्र तावडे हा दाभोलकर हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे, तर समीर गायकवडला नुकताच जमीन मंजूर झाला आहे. पवार आणि अकोलकर यांच्याबाबत कोल्हापूर सत्र न्यायालयाने गेल्या महिन्यात अटकेचे आदेश जारी करूनही ते सापडले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर अखेर बक्षीस जाहीर करण्यात आले.

दुसऱ्यांदा बक्षीस

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर फरार असलेले सनातन संस्थेचे साधक अकोलकर आणि पवार या दोन संशयितांवर सीबीआय आणि विशेष गुन्हे शाखा अर्थात एससीबी यांनी पाच लाखांचे बक्षीस यापूर्वीच घोषित केले आहे. आता पानसरेप्रकरणीही बक्षीस जाहीर केले आहे.

 

Story img Loader