शिरोळ तालुक्यातील जनतेला पिण्याचे शुद्ध आणि पुरेसे  पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जुन्या कार्यरत तसेच नवीन पाणीपुरवठा योजनांना गती देण्याबरोबरच तालुक्यातील सर्व गावांमध्ये ‘वॉटर एटीएम’ बसविण्याची विशेष मोहीम हाती घेतली जाईल, अशी घोषणा कृषी व पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज येथे केली.

शिरोळ तालुक्यातील पाणीपुरवठा, कृषी, महसूल तसेच अन्य विभागांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी शिरोळ येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आयोजित केलेल्या आढावा बठकीत खोत बोलत होते. बठकीस आमदार उल्हास पाटील, पंचायत समितीच्या सभापती मीनाक्षी कोरडे, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार गजानन गुरव, उपविभागीय कृषी अधिकारी सुरेश मगदूम उपस्थित होते.

पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यात हेतुपुरस्कर टाळाटाळ आणि हयगय करणाऱ्या कंत्राटदारांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाई करा, असे निर्देश देऊन खोत म्हणाले, की या पुढील काळात कंत्राटदारांनी एक काम पूर्ण केल्याशिवाय दुसरे वा अन्य काम त्यांना देऊ नये, तसेच कंत्राटदारांना काम दिल्यास पहिल्यांदा योजनेचा उद्भव, टाकीचे काम पूर्ण करून शेवटी जलवाहिनेचे काम करण्याचे बंधन कंत्राटदारावर घालावे, या कामी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिक दक्ष राहावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

कनवाड येथील पाणीपुरवठा योजनेचे काम अपूर्ण असताना संबंधित कंत्राटदाराला पसे दिले, ही गंभीर बाब असून या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करण्यासाठी खोत यांनी या बठकीतच चौकशी समिती घोषित करून चौकशी करण्याचे निर्देश दिले. या चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. मझरेवाडी येथील पाणीपुरवठा योजना गावच्या पाणीपुरवठा समितीकडून काढून घेऊन ती जिल्हा परिषदेने पूर्ण करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.