कोल्हापूर : आब्यांच्या अनेक प्रजातींची चव घेण्यासाठी कोल्हापूरकरांनी येथे आयोजित आंबा जत्रेला भरघोस प्रतिसाद दिला. बुधवारी पहिल्या दिवशी ६ मेट्रिक टन आंब्याची विक्री झाल्याचा दावा करण्यात आला. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दी निमित्त पणन विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने कृतज्ञता पर्वात श्री शाहू छत्रपती मिलमध्ये आजपासून उत्पादक ते ग्राहक थेट विक्री अंतर्गत ‘जत्रा आंब्याची’ या उपक्रमाला सुरुवात झाली. याचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी पणन विभागाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले उपस्थित होते. विकेल ते पिकेल व या संकल्पनेवर जत्रा आंब्याची अंतर्गत उत्पादकांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. माफक दरात उपलब्ध केलेल्या जत्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले आहे.

कोणते आंबे घ्याल?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवगड हापूस, रत्नागिरी हापूस, पायरी, बिटक्या यांसह केंट, कोकण सम्राट, रत्ना, बारमासी, दशेहरी, फरणांडीन, दूधपेढा, गोवा मानखुर, तोतापुरी, ऑस्टिन, लिली, नीलम तसेच किट (साखरविरहित) आदी १८ प्रजाती.

६ लाखांहून अधिक उलाढाल

पहिल्याच दिवशी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे आंबा उत्पादकांनी सांगितले. या ठिकाणी १८ उत्पादकांचे स्टॉल असून ६ मेट्रिक टन आंब्यांची विक्री झाली असून यातून अंदाजे सव्वा ६ लाखांहून अधिक रकमेची उलाढाल झाली असल्याची माहिती उप सरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी दिली.