नाशिकच्या काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केला, असा आरोप छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीताराजे यांनी केला होता. याबाबत संयोगीताराजे छत्रपती यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर खात्यावर एक पोस्ट लिहिली होती. त्यांच्या या पोस्टनंतर विविध स्तरांवरून प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, संभाजीराजे यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. संयोगीताराजेंच्या आरोपांवर त्यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं. कोल्हापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हेही वाचा - संभाजीनगर आणि मालवणी येथील घटनांवर शरद पवारांनी पहिल्यांदाच केल भाष्य; म्हणाले… काय म्हणाले संभाजीराजे? “संयोगिताराजे या सत्याची बाजू घेऊन बोलतात. जे पटले नाही, ते परखडपणे सांगतात. नाशिकमध्ये त्यांना जो अनुभव आला, तो त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडला. त्यांच्या परखडपणे बोलण्याचा मला सार्थ अभिमान आहे,” अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. हेही वाचा - संभाजीनगरमधील राड्यावरून जलील यांनी पोलिसांच्या भूमिकेवर उपस्थित केले सवाल; म्हणाले, “तेव्हा…” “अशा गोष्टी पुन्हा घडू नये” “महाराष्ट्र हे शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांनी चालणारे राज्य आहे. या महाराष्ट्रात अशी कृत्ये करणारे लोक का निर्माण होतात ते कळत नाही. प्रत्येकाला मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा अधिकार आहे. १०० वर्षांपूर्वी जो त्रास शाहू महाराज आणि इतर महापुरुषांना झाला, तोच प्रकार पुन्हा सुरू झाला आहे. अशा गोष्टी पुन्हा घडू नयेत,” असेही ते म्हणाले. हेही वाचा - “सर्वात मोठा हिंदू कोण? भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या स्पर्धेमुळे रामनवमीला हिंसाचार भडकला,” काँग्रेस नेत्याचा आरोप नेमकं काय आहे प्रकरण? संयोगिताराजे छत्रपती यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर खात्यावर एक पोस्ट लिहीत नाशिकच्या काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केला, असा आरोप केला होता. “नाशिकच्या काळाराम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला. अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही, हे सांगायचा प्रयत्न केला. शेवटी मी विचारले की, ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात, ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. पण तरीही मी महामृत्युंजय मंत्राचा जप का केला म्हणून त्यांनी प्रश्न केलाच," असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले होते. तसेच, '१०० वर्षांत ही मानसिकता का बदलली नाही?' असा प्रश्नही त्यांनी विचारला होता.