कोल्हापूर : ससून रुग्णालयात डॉक्टर सुनील तावरे यास अधीक्षकपदी नियुक्त करण्याबाबत आमदार सुनील टिंगरे यांच्या पत्रावर मी २६ डिसेंबर २०२३ रोजी शेरा मारला होता. मात्र ससून रुग्णालयामध्ये उंदीर चावून एकाचा मृत्यू झाल्यानंतर तावरे यास पदमुक्त केले होते. त्यामुळे ते आता अधीक्षक नाहीत. तरीही त्याने दबाव टाकून केलेली कृत्ये आता पोलीस चौकशीत उघडकीस आली आहेत. अशा पद्धतीची चूक कोणाकडूनही होऊ नये यासाठी राज्यातील संपूर्ण रुग्णालयामध्ये सुविहित, दबावरहित पद्धतीने यंत्रणा राबवली जाणार आहे, असे मत आरोग्य शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ससून रुग्णालयातील एकूणच घटनाक्रमामुळे अनेक मुद्दे चर्चेला आले आहेत. त्याची वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा होत आहेत, असा उल्लेख करून हसन मुश्रीफ म्हणाले, मुळातच ससूनसह कोणत्या रुग्णालयामध्ये चुकीच्या गोष्टी घडू नयेत. आरोग्य विषयक व्यवस्था चोखपणे कार्यरत राहिली पाहिजे. त्यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप होणार नाही अशा पद्धतीचे कामकाज पद्धती अमलात आणली जाणार आहे. त्याचे कठोरपणे पालन केले जाणार आहे. मंत्री ब्रम्हदेव नसतात अधिकारी लोकप्रतिनिधींचे पत्र आणत असतात. मात्र मंत्री हे काही ब्रह्मदेव नसतात. त्यांचे वाक्य ब्रह्म वाक्य नसते. त्यांनी चुकीचे काही लिहिले असेल तर ते दुरुस्त केले पाहिजेत, असेही हसन मुश्रीफ यांनी एका प्रश्नावेळी सांगितले.
ससूनचे डीन डॉक्टर विनायक काळे यांनी त्यांची जबाबदारी नीटपणे पार पाडली नाही असे चौकशी अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आव्हाड चुकलेच
कालच्या आंदोलनावेळी प्रसिद्धीच्या नादात जितेंद्र आव्हाड यांच्याकडून चुकीचे कृत्य घडले. आपण जे फाडणार, जळणार आहोत त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो कशाला हवा होता? त्याचेही भान त्यांना राहिले नाही. त्यांच्या या कृतीने वेदना झाल्या आहेत. या कृत्याबद्दल आव्हाड यांना धडा शिकवण्याची आवश्यकता आहे, असे हसन मुश्रीफ म्हणाले.
यावर्षी उन्हाळा मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आहे. दिल्ली नवी दिल्लीमध्ये तर ५० अंश सेल्सिअस तापमान गेल्याचे वृत्त आहे. पूर्वी आम्ही दुबईला जायचं तेव्हा ४० अंश सेल्सिअस तापमान असले तरी त्याचा त्रास होत होता. आता कोल्हापूर सारख्या शहरातील ४२ अंश सेल्सिअस तापमान पोहोचले आहे. उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. धरणातील पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने होऊ लागले आहे. काळमवाडी धरणातील दुरुस्तीचा प्रश्न आम्ही प्राधान्याने घेतला आहे. यासाठी संबंधित अधिकारी कपोले यांना सूचना दिल्या आहेत. त्यांनी दिरंगाई झाल्याचे मान्य केले आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर हे काम प्राधान्याने सुरू करण्यात येईल, असे हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.