अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनापूर्वी ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे हेच मारेकऱ्यांचे पहिले लक्ष्य होते, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. दाभोलकर खून प्रकरणातील साक्षीदाराच्या जबाबामुळे यास बळकटी आली आहे. याच धर्तीवर पानसरे खुनाचा तपास करणाऱ्या एसआयटीनेही त्या साक्षीदाराचा जबाब घेतल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
पुणे येथे २० ऑगस्ट २०१३ रोजी अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला, तर पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी रोजी बंदुकीतून गोळ्या झाडून हल्ला करण्यात आला होता. यामध्ये २० फेब्रुवारी २०१५ रोजी पानसरे यांचा मृत्यू झाला होता. तर धारवाड येथील एम. एम. कलबुर्गी यांचा ३० ऑगस्ट २०१५ रोजी गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या तिन्ही खुनाची गुन्हा करण्याची पद्धत एकच होती. यामुळे या तिन्ही हत्यांमागे एकच मास्टरमाईंड तसेच एकच पथक असल्याचा संशय तपास यंत्रणांना होता. हाच धागा पकडून पोलिसांनी तपास सुरु केला होता. पानसरे हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटीने १५ सप्टेंबर रोजी समीर गायकवाडला अटक केली. यानंतर दाभोळकर हत्येचा तपास करणाऱ्या सीआयडीने १४ एप्रिल रोजी समीर गायकवाडकडे चौकशी केली. चौकशीतून हाती आलेल्या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे १० जून २०१६ रोजी डॉ. वीरेंद्र तावडेला पनवेल येथून अटक केली. दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयच्या एका साक्षीदाराने दिलेल्या जबाबानुसार जून २०१३ साली डॉ. वीरेंद्र तावडे काही साथीदारांसह कोल्हापुरात आला होता. िबदू चौक येथून काही लोकांची रेकी करावयाची असल्याची माहितीही त्या साक्षीदाराने जबाबात दिली आहे. कामगार चळवळीचे काम करणाऱ्या पानसरे यांचे कार्यालयही याच चौकातच आहे. यामुळेच पानसरे हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटीनेही त्या साक्षीदाराचा जबाब नोंदविला आहे. या जबाबामधून मारेकऱ्यांचे पहिले टाग्रेट पानसरे असल्याचे समोर आले आहे. दाभोलकरांच्या हत्येपूर्वी तावडेसह अन्य दोघे जण कोल्हापुरात रेकी करण्यासाठी आले असल्याची माहिती साक्षीदाराने जबाबात दिली आहे. ते कोल्हापुरात रेकी करण्यासाठी आल्यानंतर कोठे राहिले याचा पोलिसांनी शोध घेतला आहे.