लोकसभा निवडणुकीसाठी तयारीला लागलेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना गुरुवारी त्यांच्याच रयत क्रांती संघटनेकडून दणका बसला. रयत क्रांती संघटनेची रयत क्रांती शेतमजूर संघटना बरखास्त करत असल्याची माहिती संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश सासणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यांच्यासोबत शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील संघटनेच्या अन्य प्रमुख पदाधिकार्‍यांनीही राजीनामे सादर केल्याने खोत यांच्या रयत क्रांती संघटनेला खिंडार पडले आहे.

सासणे म्हणाले, सदाभाऊ खोत हे चळवळीतील कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. संघर्षातून निर्माण झालेल्या या नेतृत्त्वाकडून वर्षानुवर्षे अन्याय झालेल्या शेतमजूरांना किमान न्याय मिळेल याचा विचार करुन त्यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही संघटनेची मोठ्या प्रमाणात बांधणी केली. राज्यात २ कोटी शेतमजूर असून एकट्या शिरोळ तालुक्यात ८४ हजार शेतमजूर आहे. मंत्री खोत यांच्याकडे शेतमजूरांच्या मागण्यांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही त्यांनी केराची टोपली दाखवली.

शेतमजूरांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे ही मागणी आमची होती. त्या संदर्भात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतून सकारात्मक तोडगा निघेल अशी आशा निर्माण झाली आहे. परंतु या बैठकीवेळी अथवा बैठकीनंतरही मंत्री खोत यांनी महामंडळासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. वारणानगर येथे झालेल्या शेतकरी, शेतमजूर परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतमजूर स्वतंत्र कल्याणकारी मंडळ घोषित करणार असल्याचे खोत यांनी सांगितले होते, पण त्याबाबत चकार शब्द उच्चारला गेला नसल्याने आम्ही व्यासपीठ सोडले होते. खोत यांची कामकाज पध्दत पाहता भविष्यातही शेतमजूरांना न्याय मिळणार नाही अशी खात्री झाल्याने हि संघटना बरखास्त केल्याचे सासणे यांनी सांगितले. एकूणच खोत यांची कामकाज पद्धती वापरा आणि सोडा अशी असल्याबद्दल यावेळी संताप व्यक्त करण्यात आला.

‘सुरेश’शी सूर जुळेना
सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेची स्थापना दीड वर्षापूर्वी केली तेव्हा त्यांनी इचलकरंजी येथील उद्योजक सुरेश पाटील यांच्याकडे अध्यक्षपद सोपवले होते, पण अल्पकाळातच त्यांच्यात दुरावा आला. तर रयत क्रांती शेतमजूर संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्षपद दुसरे सुरेश म्हणजे सासणे यांच्याकडे सोपवले होते.