कोल्हापूर : शिरोळ नगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीने सत्ता प्राप्त केली. या आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमरसिंह पाटील यांनी विजय मिळवला. तर, ९ नगरसेवक विजयी झाल्याने स्वबळावर सत्ता मिळवता आली. पाटील यांना अवघ्या ३३ मतांनी विजय मिळवता आला. या आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा समावेश आहे. भाजपला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यांना सात जागांवर विजय मिळवता आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिरोळ नगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी रविवारी आठ प्रभागांतून १७ जागांसाठी २१ हजार ७३१ मतदारांपैकी १७ हजार ३६७ मतदारांनी मतदान केले. सोमवारी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या उपस्थितीत मतमोजणी झाली.

अवघ्या ३३ मतांनी विजय

लक्षवेधी ठरलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शाहू आघाडीचे अमरसिंह पाटील विजयी झाले. मूळचे राष्ट्रवादीचे असलेल्या पाटील यांना ७३०४ मते मिळाली. भाजपचे पृथ्वीराज अनिल यादव यांना ७२७१  मते मिळून ते दुसऱ्या स्थानी राहिले. शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील आणि गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडीचे रणजित दिलीप पाटील यांना १४७६ तर कोल्हापूर जिल्हा ताराराणी आघाडीचे प्रमोद लडगे यांना ९५८ मते मिळाली. नोटाच्या खात्यात ७२ मते राहिली. चुरशीच्या लढतीत पाटील यांना अवघ्या ३३ मतांनी विजय मिळवता आला.

निकाल घोषित करण्यात आल्यावर शाहू आघाडीच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. या आघाडीच्या प्रचारात खासदार राजू शेट्टी, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांनी सहभाग घेतला होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर यांनी भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र पाटील यद्रावकर, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, स्वाभिमानीचे पंचायत समिती सदस्य सचिन शिंदे यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार केला.

फेरमतमोजणी – निकाल कायम

नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या चार प्रभागांत फेरमतमोजणीची मागणी भाजपने केली. काठावर निकाल असल्याने धाकधूक वाढली होती. मात्र, फेरमतमोजणी होऊ नही निकाल पूर्ववत राहिला. निकालानंतर पक्षीय बलाबल याप्रमाणे- शाहू आघाडी-९, भाजप-७, अपक्ष-१ असे राहिले.

तर भाजपचा पराभव शक्य

निकालानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना भावी अमरसिंह पाटील म्हणाले, की काँग्रेस, राष्ट्रवादी व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचा हा सांघिक विजय आहे. मित्रपक्ष एकत्र आले, तर भाजपला पराभूत करता येते, असा संदेश या निकालातून सर्वत्र गेला आहे.

प्रभाग निहाय निकाल

प्रभाग क्रमांक १ – योगेश पुजारी – शाहू आघाडी, विदुंला यादव – भाजप, प्रभाग २- अरविंद माने – अपक्ष, अनिता संकपाळ – भाजप, प्रभाग ३ – कुमुदिनी कांबळे – शाहू आघाडी, राजेंद्र माने – शाहू आघाडी,प्रभाग ४ – सुनीता आरगे – भाजप, तातोबा पाटील – शाहू आघाडी, प्रभाग ५ – इमान अत्तार – भाजप, कमलाकर शिंदे – शाहू आघाडी, प्रभाग ६ – दादासाहेब कोळी – भाजपा, कविता भोसले – भाजपा, प्रभाग ७ – करुणा कांबळे – शाहू आघाडी , श्रीवर्धन माने देशमुख – भाजपा , प्रभाग ८ – सुरेखा पुजारी, जयश्री धर्माधिकारी , प्रकाश गावडे – सर्व शाहू आघाडी.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahu alliance get highest seat in shirol municipal elections
First published on: 23-10-2018 at 02:37 IST