सतीश कामत

कोकणात सध्या रायगड आणि आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग हे दोनच लोकसभा मतदारसंघ असले तरी २००९ पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी व राजापूर हे दोन लोकसभा मतदारसंघ होते आणि तळकोकणातील या मतदारसंघांनी आपापले सामाजिक-राजकीय वेगळेपण कायम जपले. २००८ च्या मतदार संघ पुनर्रचनेनंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मिळून एकच लोकसभा मतदारसंघ तयार झाला. पण राजकीय वेगळेपण कायम राहिले.

Dhule lok sabha, BJP,
मतदारसंघाचा आढावा : धुळे; विरोधी मतांचे विभाजन टळल्याने भाजपपुढे आव्हान
NCP MP Supriya Sule
बारामतीच्या निवडणुकीबाबत सुप्रिया सुळेंची सूचक प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मला कशाचीच भिती…”
sangli lok sabha marathi news, sangli lok sabha bjp marathi news
मतदारसंघाचा आढावा : सांगली; महाविकास आघाडीतील गोंधळाचा भाजपला फायदाच
Aditya Yadav viral photo
मतदानाआधी समाजवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा मुलगा अडचणीत; स्विमिंग पूलमधील ‘ते’ फोटो व्हायरल
Bihar Loksabha Election 2024 CPM Khagaria Left party
एकमेव मुस्लीम खासदाराने सोडली एनडीएची साथ; डाव्या पक्षाच्या उमेदवाराला दिला पाठिंबा
akshay bam
सूरतपाठोपाठ इंदूरमध्ये माघारनाट्य, काँग्रेस उमेदवाराकडून अर्ज मागे ; लोकशाहीला धोका असल्याचा पक्षाचा आरोप
after month BJP and NCP active in campaigning in Maval Ajit Pawar and Parth Pawars attention on every development
पिंपरी : अखेर महिनाभरानंतर मावळमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस प्रचारात सक्रिय; प्रत्येक घडामोडीवर अजित पवार, पार्थ पवारांचे लक्ष
Mahavikas Aghadi, Bhiwandi
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडखोरीची चिन्हे, मतदारसंघात पहिल्याच दिवशी ५४ अर्जांचे वितरण

राजापूर मतदारसंघाचे वलय कशामुळे?

रत्नागिरी आणि राजापूर हे दोन स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ होते तेव्हा राजापूर मतदारसंघाचे सुरुवातीपासूनच वेगळे वलय होते. समाजवादी चळवळ आणि कॉंग्रेस या दोन पक्षांचे इथे मोठे जाळे होते. देश स्वतंत्र झाल्यानंतर १९५२ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत राजापूर मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे मोरेश्वर दिनकर  उर्फ तात्या जोशी विजयी झाले. लोकसभेत निवडून गेल्यावर कोकणातील खाण उद्योगाबरोबरच कोकण रेल्वेचाही विषय तात्यांनी संसदेच्या पटलावर मांडला. पण पुढल्याच निवडणुकीपासून  इथे बॅ. नाथ पै आणि नंतर त्यांचा वारसा समर्थपणे चालवलेले प्रा. मधू दंडवते यांनी सुमारे दोन दशके समाजवादी विचारांचा झेंडा फडकवत ठेवला.

हेही वाचा >>> लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार का केला? या टोळीची व्याप्ती किती? पुन्हा हल्ला करण्याची धमकी किती गंभीर?

बॅ. नाथ पैंचा वारसा…

खरं तर १९५७च्याही निवडणुकीत जोशीच पुन्हा निवडून येतील असे वातावरण होते. पण उच्च विद्याविभूषित, तरीही अतिशय अनौपचारिक पद्धतीने सामान्य माणसाशी संवाद साधणारे,अकृत्रिम जिव्हाळा जपणारे बॅ. नाथ पै यांनी राजापूर मतदारसंघातून प्रजा समाजवादी पक्षातर्फे प्रथमच निवडणूक लढवताना जोशी यांचा एक लाखाहून जास्त मतांनी पराभव केला. संसदेत गेल्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या विषयावर केलेल्या पहिल्याच भाषणात त्यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेकांचे लक्ष वेधून घेतले. मतदारसंघातील अर्धशिक्षित, अडाणी लोकांमध्ये बॅ. पै अशा तऱ्हेने मिसळून जात, की हा मनुष्य राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषदा गाजवत असेल, असे कोणाला वाटायचे नाही.

जनसंघाला एकदाच संधी

या निवडणुकीत शेजारच्या रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून तत्कालीन जनसंघातर्फे असार प्रेमजीभाई रणछोडदास काँग्रेसचे जगन्नाथराव भोसले यांचा सुमारे ५० हजार मतांनी पराभव करून संसदेवर गेले. त्यांच्या रूपाने कोकणातून जनसंघाचा प्रतिनिधी प्रथमच संसदेत गेला. अर्थात त्या काळात ऐन भरात असलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा घटक पक्ष म्हणून ते शक्य झाले. त्यानंतर आजतागायत ही किमया आधी जनसंघ आणि नंतर भाजपला साधलेली नाही.

हेही वाचा >>> ‘एक शेरनी सौ लंगूर’ ते ‘फिर एक बार, मोदी सरकार’; निवडणूक घोषणांचा इतिहास काय सांगतो?

काँग्रेसच्या मराठमोळ्या मुखर्जीबाई…

बॅ. पै यांनी १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकीतही विजयाची परंपरा कायम राखली. मात्र शेजारच्या रत्नागिरी मतदारसंघातून काँग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्या शारदा मुखर्जी यांनी प्रजा समाजवादी पक्षाचे विचारे यांचा पराभव केला. कोकणातून मुखर्जी नावाची व्यक्ती निवडणूक कशी लढवली असा एक प्रश्न सहज मनात येऊ शकतो. पण या बाई मूळच्या शारदा पंडित. मुंबईत मराठमोळ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला आणि एअर चीफ मार्शल सुब्रतो मुखर्जी यांच्याशी विवाहानंतर त्या शारदा मुखर्जी झाल्या. या मतदारसंघातून दोन वेळा विजयी झालेल्या मुखर्जीबाईंनी १९७१ मध्ये काँग्रेसतर्फे राजापूर मतदारसंघातून निवडणूक लढवली. तिथे मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला.

समाजवादी चळवळीची परंपरा

बॅ. पै यांच्या अकाली, आकस्मिक निधनानंतर त्यांची गादी चालू शकणाऱ्या उमेदवाराच्या शोधात असलेल्या प्रजा समाजवादी पक्षाला प्रा. मधु दंडवते यांच्या रूपाने तितक्याच तोलामोलाचा नेता मिळाला. १९६९ मध्ये काँग्रेस फुटल्यानंतर १९७१ मध्ये झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत प्रा. दंडवते यांनी काँग्रेसचे उमेदवार आणि सावंतवाडी संस्थानाचे राजे श्रीमंत  शिवरामराजे भोसले यांचा जेमतेम तीन हजार मतांनी निसटता पराभव केला. तेव्हापासून पुढील  सुमारे दोन दशके प्रजा समाजवादी पक्षाचा या मतदारसंघावर प्रभाव राहिला. या काळात सलगपणे प्रतिनिधित्व केलेले प्रा. दंडवते यांनी संसद आणि कोकण या दोन्हींतला प्रभावी दुवा म्हणून अतिशय उत्तम कामगिरी बजावली. १९७७ मध्ये सत्तेवर आलेल्या जनता पक्षाच्या सरकारात रेल्वेमंत्री आणि १९८९ मध्ये पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंह यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून काम करताना दंडवतेंनी कोकण रेल्वेचा प्रकल्प मार्गी लावला आणि कोकणवासीयांनी दीर्घ काळ उराशी बाळगलेले स्वप्न प्रत्यक्षात आणले. त्याचबरोबर, रेल्वे नफ्यामध्ये आणणारे ते पहिले रेल्वेमंत्री ठरले.

शिवसेनेचा शिरकाव कधी झाला?

योगायोगाची गोष्ट म्हणजे, प्रा. दंडवते राजापूर मतदारसंघातून प्रथम निवडून गेले त्याच निवडणुकीत (१९७१) शेजारच्या रत्नागिरी मतदारसंघातून समाजाशी उत्तम प्रकारे नाळ जोडलेले काँग्रेसचे उमेदवार शामराव पेजे यांनी तत्कालीन जनसंघाचे उमेदवार चंद्रकांत काशिनाथ उर्फ बापूसाहेब परुळेकर यांचा पराभव केला. त्याचबरोबर या निवडणुकीत शिवसेनेने प्रथमच कोकणात अनिल बिर्जे यांच्या रूपाने उमेदवार रिंगणात उतरवला. त्यांना त्या काळात जेमतेम २० हजार मते मिळाली. त्यानंतर येथून शिवसेनेचा खासदार संसदेत जाण्यासाठी २५ वर्षे लागली.

समाजवादी मक्तेदारी संपुष्टात…

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर १९९१ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रा. दंडवते यांचा पराभव झाला आणि राजापूर मतदारसंघातील समाजवादी पक्षाची मक्तेदारी संपुष्टात आली. काँग्रेस पक्षातर्फे मेजर सुधीर सावंत विजय झाले. पण १९९६च्या लोकसभा निवडणुकीपासून इथे शिवसेनेने आपली पकड निर्माण केली. २००९ ते २०१४ चा अपवाद वगळता ती आजतागायत कायम राहिली आहे. रत्नागिरी मतदारसंघातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत गीते, तर राजापुरातून उच्चशिक्षित उमेदवार सुरेश प्रभू यांनी १९९६ ते २००९ पर्यंत या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले. त्यापैकी प्रभू यांना निवडून आणण्यात, यंदा या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता असलेले कोकणातील वजनदार नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची महत्त्वाची भूमिका राहिली.

नारायण राणेंच्या कौशल्याची कसोटी

शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर राणे यांनी २००५ मध्ये काँग्रेसची वाट धरली. त्यामुळे मतदारसंघ पुनर्रचनेनंतर २००९ मध्ये झालेल्या पहिल्याच निवडणुकीत त्यांचे चिरंजीव निलेश यांनी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत शिवसेनेचे उमेदवार प्रभू यांचा सुमारे पन्नास हजार मतांनी पराभव केला. पण काँग्रेसचं हे समाधान त्या निवडणुकीपुरतेच टिकले. त्यानंतरच्या लागोपाठ दोन निवडणुकांमध्ये नीलेश यांचा शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी पराभव केला. यंदा होत असलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे ठाकरे गटाचे खासदार राऊत पुन्हा एकदा रिंगणात आहेत. महायुतीतर्फे राणे यांची उमेदवारी निश्चित होण्याची चिन्हे आहेत. तसे झाले तर बाळासाहेब ठाकरेंच्या दोन ‘कडवट’ आजी-माजी सैनिकांमध्ये सामना रंगणार आहे. आत्तापर्यंत या मतदारसंघात दोन भिन्न विचारधारांचे पक्ष एकमेकांशी झुंजले. या निवडणुकीत हिंदुत्ववादी विचाराचा दावा करणारे दोन पक्ष एकमेकासमोर उभे ठाकले आहेत. यामध्ये राऊत विजयाची हॅट्रिक करत शिवसेनेचा हा गड अभेद्य ठेवतात, की इथल्या राजकारणात मुरलेले लढवय्ये राणे त्यांचा सारा अनुभव आणि कौशल्य पणाला लावून भाजपचे कमळ प्रथमच फुलवतात, याबाबत उत्कंठा आहे.