कोल्हापूर : चंदगड नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सोमवारी एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अजितदादा गटाचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेत भाजपला शह दिला आहे.चंदगड विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अजितदादा गटाचे तत्कालीन आमदार राजेश पाटील यांचा पराभव करून अपक्ष शिवाजी पाटील विजयी झाले होते. देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या संबंधामुळे त्यांनी भाजपचे समर्थक आमदार अशी भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी दौलत कारखाना चालवायला घेतलेले मानसिंग खोराटे व जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी तथा विनायक पाटील यांची एकत्रित मोट बांधली आहे. त्यातून त्यांनी महायुतीचे राजेश पाटील यांना खो दिला.

या घडामोडीमुळे नाराज झालेले हसन मुश्रीफ यांनी शरद पवार गटाच्या माजी आमदार संध्यादेवी कुपेकर व त्यांची कन्या नंदा बाभूळकर यांच्याशी जुन्या संबंधातून राज्य ऐक्य साधले आहे. यातूनच आज हसन मुश्रीफ, राजेश पाटील व नंदा बाभूळकर यांनी गडहिंग्लज येथे एकत्रित येऊन चंदगड तालुक्यातील निवडणूक एकत्रित लढवण्याची घोषणा केली. तसेच कागल, गडहिंग्लज व मुरगुड येथेही ही आघाडी कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले.

एकत्र येण्याची पार्श्वभूमी

चंदगड तालुक्यात तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुती या संकल्पनेला तडा जाऊ लागला आहे. अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी असलेल्या जवळिकीतून भाजपसमर्थक म्हणून काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यांचा प्रभाव रोखण्यासाठी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार संध्यादेवी कुपेकर व त्यांची कन्या नंदिनी बाभूळकर यांनी आगामी निवडणुकीसाठी एकत्रित येण्याची तयारी निश्चित केली आहे.

निम्म्या जागा वाटून घेण्याचे सूत्र पक्के झाले आहे. या निमित्ताने विधानसभेचे दिवंगत अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर आणि नरसिंह पाटील हा प्रबळ गट एकत्र येण्याचे संकेत आहेत. हसन मुश्रीफ यांच्या कागल विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या गडहिंग्लज या मोठ्या नगरपालिकेमध्ये जनता दलाचे दिवंगत प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांची कन्या, माजी नगराध्यक्ष स्वाती कोरी, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे हे एकत्रित येण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसे घडल्यास ही आघाडी प्रभावी ठरू शकते. या बाबी लक्षात घेऊन मंत्री मुश्रीफ यांनी आपण कोठे कमी पडू नये यासाठी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांना एकत्रित आणण्याचे प्रयत्न आहेत. या माध्यमातून एकीकडे गडहिंग्लजमधील नव्या आघाडीला शह देतानाच चंदगडमधील आमदारांचा प्रभाव रोखण्याची खेळी मुश्रीफ यांनी चालवलेली आहे.