scorecardresearch

Premium

समविचारी पक्षाबरोबरच राहण्याची राष्ट्रवादीची भूमिका- शरद पवार

देशभरातील आजची  परिस्थिती पाहता  त्या विरोधात उभे राहण्याची गरज आहे. 

sharad pawar, sugar factory,marathi news, marathi, Marathi news paper
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

देशभरातील आजची  परिस्थिती पाहता  त्या विरोधात उभे राहण्याची गरज आहे.  राज्यघटनेवरच  हल्ला होत असेल तर परिवर्तनाची  गरज आहे. त्यामुळे आगामी  काळात समविचारी पक्षाबरोबरच राहण्याची  राष्ट्रवादीची भूमिका असेल, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादीचे नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे दिली.

सदाशिवराव मंडलिक यांच्या ८३व्या जयंतीनिमित्त, सदाशिवराव मंडलिक इरिगेशन, अ‍ॅग्रिकल्चर, एज्युकेशन अ‍ॅन्ड कल्चरल डेव्हलपमेंट रीसर्च फौंडेशनच्या वतीने लोकनेते सदाशिवराव मंडलिक स्मृती पुरस्काराचे वितरण शरद पवार यांच्या हस्ते येथे करण्यात आले. संयोजक, शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक यांनी प्रास्ताविक केले. पवार यांनी भाजप सरकारची ध्येयधोरणे आणि शेतकरी कर्जमाफी या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांवर शरसंधान केले. ते म्हणाले, विद्यमान शासन हे सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी विरोधी आहे.

१५ ते २० हजार रुपयांच्या कर्जाची शेतकरी प्रामाणिकपणे परतफेड करीत असतो, मात्र मोठमोठे उद्योजक बँकांच्या कोटय़वधींच्या कर्जाची परतफेड करीत नसल्याचे चित्र आहे.  डबघाईला आलेल्या बँकांना सरकारने ८० हजार कोटीचे अनुदानरूपी भांडवल बडय़ांना दिले आहे.  त्यामुळे हे सरकार नेमके  कोणासाठी काम करीत आहे, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.

मंडलिक शिवसेनेचे उमेदवार

गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सदाशिवराव मंडलिक यांच्या काळात त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करीत यापुढील काळात संजय मंडलिक यांनाच लोकसभेची शिवसेनेची उमेदवारी देण्याचे निश्चित असल्याचे  सांगितले.

मंडलिक यांच्या उमेदवारीचे समर्थन

आमदार हसन मुश्रीफ हे सदाशिवराव मंडलिक यांच्या आठवणीने काही वेळ भावनिक झाले होते. संजय मंडलिक यांना खासदार करण्याचे  मंडलिक यांचे स्वप्न  पूर्ण करायची आम्हाला संधी मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आमदार सतेज पाटील यांनीही  मंडलिक यांच्या विचाराचा वसा आणि वारसा पुढे चालवण्याकरिता संजय मंडलिक यांना सर्वाचा आशीर्वाद मिळावा, असे आवाहन केले.

या वेळी  उद्योजक हणमंतराव गायकवाड, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार,  डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे आणि विलास शिंदे यांना शरद पवार, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पवार शेट्टींची परस्परांवर स्तुतिसुमने

शरद पवार राजू शेट्टी यांनी आजवर एकमेकांवर टीका केली, पण या कार्यक्रमात त्यांनी कौतुकाची उधळण करत आगामी राजकारण कोणत्या दिशेने जाणार याचे संकेत दिले. खासदार  शेट्टी यांनी साखर प्रश्नी आपण सातत्याने सरकारशी दोन हात करूनही सरकारला जाग येत नसल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याची साद घातली. तर पवार यांनी शेतकरी हितासाठी शेट्टी करत असलेले आंदोलन योग्य असल्याचा निर्वाळा दिला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sharad pawar comment ncp will not ally with bjp

First published on: 12-02-2018 at 00:58 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×